अबुधाबी : यंदा आयपीएलच्या साखळी फेरीत चेन्नई संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला. सीएसकेचा फोकस पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलवर असल्याचे धोनीने याआधीच स्पष्ट केले होते. किंग्ज इलेव्हनवर विजय मिळवल्यानंतर धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्यावर्षीसाठी संघाच्या कोअर ग्रुपमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त करताना पुढील १० वर्षांचा विचार करून संघ बांधणी करावी लागेल, असे सांगायला धोनी विसरला नाही. संघाची धुरा पुढील पिढीकडे सोपवण्याची हीच वेळ आहे, असेही धोनी म्हणाला.
रविवारी सामना संपल्यानंतर धोनीने संघाच्या कामगिरीविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ‘ही स्पर्धा खूप खडतर होती, आम्ही चुकाही केल्या. शेवटच्या चार सामन्यांत आम्ही जसा खेळ केला तसा खेळ आधीपासून अपेक्षित होता. संघातील सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे.
सतत पराभव होत असणाऱ्या ड्रेसिंग रूममध्ये राहणे कोणालाही आवडत नाही. पुढच्या वर्षी बीसीसीआय लिलावासंदर्भात काय निर्णय घेईल, याकडे लक्ष लागले आहे. प्रमुख खेळाडूंच्या सेटअपमध्ये थोडे बदल करायचे आहेत, पुढील ९-१० वर्षांसाठी संघ बांधणीचा विचार करायचा आहे. सुरुवातीच्या सामन्यांपासून गेली १० वर्षे संघासोबत असलेल्यांना संधी दिली, आता नवीन खेळाडूंना ही जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. चाहत्यांना मी इतकेच सांगू इच्छितो की पुढच्या हंगामात आम्ही दमदार पुनरागमन करू,’ दमदार कामगिरीसाठीच आम्ही ओळखले जातो.’
‘आयपीएलच्या सुरुवातीला आम्ही एक चांगली टीम तयार केली होती. या संघाने १० वर्षी चांगली कामगिरी केली. आता पुढील पिढीकडे हा संघ सोपवण्याची वेळ आली आहे. आठव्या स्थानावर असलेल्या माझ्या संघाला पुढे जोरदार कमबॅक करावे लागेल,’ असे धोनीने म्हटले आहे.