दुबई : पहिल्या क्वालिफायर लढतीत डेथ ओव्हर्समधील आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करताना दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी फायनलमध्ये धडक मारण्यासाठी संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दिल्लीला रविवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पॉन्टिंग म्हणाले, ‘पहिल्या काही षटकांमध्ये आमची कामगिरी चांगली झाली. त्यावेळी त्यांची ४ बाद १२० अशी स्थिती होती. आम्हाला वाटले ते १७० पर्यंत मजल मारतील आणि आम्हाला लक्ष्य गाठता येईल.’
दिल्लीने अखेरच्या पाच षटकात ७८ धावा बहाल केल्या. पॉन्टिंग म्हणाले, ‘अखेरच्या पाच षटकात आमची कामगिरी निराशाजनक झाली. आम्ही हार्दिक पांड्याला त्याच्या मनाप्रमाणे गोलंदाजी केली. ईशान किशननेही यंदाच्या मोसमात आमच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. आम्ही स्पर्धेत योजनाबद्ध खेळ केला, पण या लढतीत दडपणाखाली आम्हाला रणनीतीनुसार खेळ करता आला नाही. पृथ्वी शॉ चांगल्या चेंडूवर बाद झाला.
अजिंक्य ज्या चेंडूवर बाद झाला तो शानदार चेंडू होता. शिखर धवनला जसप्रीत बुमराहने ज्या यॉर्करवर बाद केले तो सर्वोत्तम होता. पुढील सामन्याला दोन दिवसांचा अवधी आहे. आम्हाला सांघिक रूपाने सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.’