दुबई : दिल्ली कॅपिटल्सच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा एकतर्फी सामन्यात ५९ धावांनी पराभव झाला.
दिल्लीने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर १९६ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव ९ बाद १३७ धावांवर रोखला गेला. कोहलीने एकाकी झुंज देताना ३९ चेंडूंत ४३ धावा फटकावल्या. आरसीबीच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले ते वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने. त्याने २४ धावांत ४ बळी घेतले. अॅन्रीच नॉर्जे आणि अक्षर पटेल यांनीही २ बळी घेत चांगला मारा केला.
त्याआधी, आक्रमक सुरुवात केलेल्या दिल्लीने पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि मार्कस स्टोईनिस यांच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला. दमदार सुरुवातीनंतर काही चेंडूंच्यां फरकाने स्थिरावलेले दोन्ही सलामीवीर बाद झाल्याने दिल्लीचा डाव अडचणीत आला. मात्र मार्कस स्टोईनिस आणि रिषभ पंत यांनी वेगवान ८९ धावांची भागीदारी करत धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी बाद झाल्यानंतर दिल्लीची धावागती काहीशी मंदावली. मात्र स्टोईनिसच्या आक्रमकतेमुळे दिल्लीचे पुनरागमन झाले. स्टोईनिसने २६ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या.
सामन्यातील रेकॉर्ड
टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली पहिला भारतीय ठरला.
असा पराक्रम करणारा कोहली क्रिकेटविश्वातील एकूण सातवा फलंदाज ठरला.
याआधी टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड ( दोघेही वेस्ट इंडिज), शोएब मलिक (पाकिस्तान), ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड), डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच (दोघेही आॅस्टेÑलिया) यांनी ९ हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
टर्निंग पॉइंट
फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर अक्षर पटेल व कॅगिसो रबाडाने भेदक मारा करीत संघाचा विजय निश्चित केला.
विनिंग स्ट्रॅटेजी
सांघिक कामगिरीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजीमध्येही सांघिक कामगिरी विजयाचे गमक ठरली.