अबूधाबी : स्टार खेळाडूंच्या समावेशानंतरही आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सपुढे इंडियन प्रीमियर लीगच्या लढतीत बुधवारी चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान राहणार आहे.
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक आतापर्यंत अपयशीच ठरला. इंग्लंडचा विश्वकप विजेता कर्णधार इयोन मॉर्गनकडे कार्तिकच्या स्थानी नेतृत्व सोपविण्यात आलेले नाही. कार्तिकला आतापर्यंत चार सामन्यांत केवळ ३७ धावा करता आल्या. त्याला स्वत:च्या गोलंदाजांवर विश्वास दाखवावा लागेल. विशेषत: भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव याच्यावर. त्याचा अद्याप पूर्णपणे वापर करण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. धोनीने शेन वॉटसनवर विश्वास कायम राखला. त्याने गेल्या लढतीत ५३ चेंडूंत नाबाद ८३ धावा केल्या. जाताना नाबाद ८३ धावा केल्या.
ही लढत दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा ठरणार आहे. नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्ही आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेला हा खेळाडू सतत टीकेचा धनी ठरला. त्याचे काही निर्णय पूर्णपणे चुकीचे ठरले.वेस्ट इंडिजचा सुनील नारायन याने चार सामन्यात केवळ २७ धावा केल्या. तरीही त्याला सलामीला पाठवण्याचा मोह कार्तिकला आवरत नाही. तो स्वत: फलंदाजीत पुढाकार का घेत नाही, असा टीकाकारांचा सवाल आहे.
वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३६ डिग्री सेल्सियस, ह्युमिडिटी ४९ टक्क्याच्या जवळपास राहण्याची शक्यता. हवेचा वेग २१ किलोमीटर प्रति तास असू शकतो.
पीच रिपोर्ट । खेळपट्टी नेहमीप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आणि २०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता, पण चुरशीच्या लढतीत गोलंदाजांची कामगिरी निर्णायक.
मजबूत बाजू
चेन्नई । चेन्नईचा संघ सलग तीन पराभवानंतर विजय मिळविल्यामुळे उत्साहात आहे. शेन वॉटसनला सूर गवसला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश.
कोलकाता । इयोन मॉर्गन व आंद्र रसेल यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांचा समावेश. टॉम बेंटोनला संधी मिळाली तर फलंदाजी अधिक मजबूत होईल.
कमजोर बाजू
चेन्नई । गेल्या सामन्यात मधल्या फळीला संधी मिळाली नाही, पण त्याआधी खेळल्या गेलेल्या लढतीत मधली फळी अपयशी ठरली होती.
कोलकाता । दिनेश कार्तिक नेतृत्व व फलंदाजीमध्ये अपयशी. गोलंदाजांचा योग्य पद्धतीने वापर करण्यात अपयश. सुनील नारायणने चार सामन्यांत २७ धावा केल्या.