- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर, लोकमत)
आयपीएलला गेल्या काही दिवसांमध्ये दोन मोठे धक्के लागले आहेत. त्यातही हे धक्के चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघासाठी मोठे आहेत. पहिले म्हणजे, सीएसकेशी संबंधित तब्बल १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन खेळाडूंचा समावेश असून बाकीचे सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. ही चाचणी झाल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी सीएसके संघातील दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली. प्रसिद्धीच्या दृष्टीने आणि कामगिरीच्या दृष्टीनेही रैना हा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतरचा दुसºया क्रमांकाचा खेळाडू आहे. त्यामुळे चेन्नई संघासाठी नक्कीच ही चांगली बाब नव्हती. त्याने यामागे वैयक्तिक कारण दिले आहे, पण हे वैयक्तिक कारण नेमके काय आहे, हे अद्याप मला समजलेले नाही.
सर्वप्रथम जे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले, ते कसे पॉझिटिव्ह आढळले हे जाणून घ्यायला हवे. नेमके काय झाले किंवा कशामुळे झाले हे अद्याप कळलेले नाही. कारण भारतातून यूएईला जाण्याआधी सर्वांची कोरोना चाचणी झाली. तसेच सर्व जण जैव सुरक्षित वातावरणात होते. जवळपास एक आठवड्यापर्यंत सर्वांनी स्वत:ला कोरोना चाचणीसाठी सज्ज ठेवले होते. पण ज्या दिवशी सांघिक सराव सुरू होणार होता, त्याच दिवशी हे सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. चेन्नईत झालेली चाचणी चुकीची होती का? किंवा दुबईत गेल्यानंतर संघातील सदस्य कोणाच्या संपर्कात आले होते का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे, जे सदस्य पॉझिटिव्ह आढळले त्यापैकी कोणाचीही स्थिती गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लवकरच हे सर्व सदस्य स्पर्धेसाठी सज्ज होतील.
परंतु, हे एकंदरीत चित्र पाहता आता सीएसके संघ सलामीचा सामना खेळू शकणार नाही असे दिसत आहे. आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांच्यात रंगणार होता. हा एक ब्लॉकबस्टर सामना होता. पण सीएसकेमध्ये झालेला कोरोनाचा प्रवेश पाहता आता सलामीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर खेळू शकते. एकूणच सध्या संपूर्ण स्पर्धेवर गंभीर परिणाम पडू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुसरे प्रकरण म्हणजे सुरेश रैना. त्याने दिलेले वैयक्तिक कारण काय आहे, हे अद्याप कोणालाही कळलेले नाही. रैनाने जेव्हा माघार घेतली, त्यानंतरच्या दुस-या दिवशी सीएसके संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी रैनावर टीका केली. त्यांनी म्हटले की, ‘यश खेळाडूंच्या डोक्यात गेल्यावर ते स्वत:ला खूप मोठे समजतात. यामध्ये जे काही नुकसान होईल ते रैनाचे होईल.’ शिवाय कर्णधार महेंद्रसिंग धोनी पूर्ण नियंत्रणात असल्याचेही श्रीनिवासन यांनी सांगितले.
एका गोष्टीवर गंभीरतेने पाहावे लागेल की, स्पर्धेत रैनाची फी ही सुमारे ११ कोटी किंवा त्याहून अधिक आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेला दूर करणे सोपे काम नाही. त्यामुळेच रैनाने दिलेले वैयक्तिक कारण नक्कीच खूप गंभीर असले पाहिजे, अन्यथा कोणीही इतकी मोठी रक्कम नाकारण्याचा निर्णय घेणार नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे श्रीनिवासन यांनी रैनावर टीका केल्यानंतर दुस-याच दिवशी त्याचे कौतुकही केले. त्यामुळे आता हे प्रकरण थोडे निवळत असल्याचेही दिसत आहे. पण सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक निर्णयामध्ये पारदर्शकता असावी असे माझे मत आहे. कारण आयपीएलच्या सुरुवातीलाच असे वाद किंवा अडचणी निर्माण झाल्या, तर नक्कीच याचा परिणाम स्पर्धेवरही होईल.