Join us  

IPL 2020 : चाहर बंधू वेधून घेताहेत लक्ष, दीपक खेळतोय चेन्नईकडून तर राहुल खेळतोय मुंबईकडून

दीपक हा राजस्थान राॕयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंटस आणि आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला तर राहुल हा रायझिंग पुणे व मुंबई इंडियन्सतर्फे खेळलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 1:19 PM

Open in App

-ललित झांबरेआयपीएलच्या पहिल्या सामन्यात शनिवारी भावंडांच्या दोन जोड्या खेळल्या. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक व कृणाल हे पांड्या बंधू आणि मुंबईकडून खेळलेला राहुल तर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला दीपक हे चाहर बंधू. पांड्या बंधू हे आता सर्वांना माहित आहे पण चाहर बंधू अद्याप तेवढे नावारुपाला यायचे आहे. हार्दिक व कृणाल ही सख्खी भावंड तर दीपक व राहुल हे चुलत बंधू. दीपक 28 वर्षांचा म्हणजे सिनियर आणि राहुल हा 21 वर्षांचा. दीपक हा राजस्थान राॕयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंटस आणि आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला तर राहुल हा रायझिंग पुणे व मुंबई इंडियन्सतर्फे खेळलाय. दोघेही गोलंदाज पण दीपक हा मध्यमगती तर राहुल हा लेगब्रेक गुगली गोलंदाज.यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात शनिवारी दीपक चाहरने सलग तिसऱ्या वर्षीच्या आयपीएलचे पहिले षटक टाकण्याची अनोखी हॕट्ट्रिक केली आणि चार षटके गोलंदाजी करताना मुंबईच्या यादव व ट्रेंट बोल्टचे बळी मिळवले. राहुलने रायडूसारखा स्थिरावलेला फलंदाज स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडला आणि 26 धावांवर असताना आपण रायडूचा झेल घेऊ न शकल्याची चूक सुधारली. दोघांचीही कामगिरी अगदी उठूनषदिसावी अशी नसली तरी त्यांनी लक्ष वेधून घेतले हे मात्र निश्चित.गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये दीपकने 17 सामन्यात 7.47 च्या सरासरीने 22 विकेट काढल्या होत्या तर राहुलने 13 सामन्यांत फक्त सहा धावांच्या प्रभावी इकॉनाॕमीने 12 गडी बाद केले होते.या चुलत भावंडांची सुरुवात आग्र्यातील गल्ली क्रिकेटपासून झाली. गल्ली क्रिकेटपासून भारताच्या संघात असा त्यांचा प्रवास राहिला आहे. दीपक लोकेंद्रसिंह चहर हा भारतासाठी दोन वन डे आणि 65 टी-20 सामने खेळलाय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॕट्ट्रिक करणारा तो पहिला भारतीय आहे. दुसारीकडे राहुल देसराज चाहर हा एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलाय. 2017 मध्ये हे दोन्ही भाऊ रायझिंग पूणे सुपरजायंटसच्या संघात होते. हे दोघेही भले आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांकडून खेळत असो पण आयपीएलच्या व्यासपीठाचा वापर करुन राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रभावीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आतापर्यंत तरी राहुलने चेंडूवर उत्तम नियंत्रण राखणारा उपयुक्त लेगब्रेक गोलंदाज असा लौकिक मिळवला आहे तर दीपकची ओळख पाॕवरप्लेमधला प्रभावी गोलंदाज अशी आहे. रणजी ट्रॉफीत हे दोघे भाऊ राजस्थानसाठी खेळतात.या दोघांचे नाते विलक्षण आहे. त्यांचे दोघांचे वडील भाऊ होते तर दोघांच्या आई एकमेकांच्या बहिणी आहेत. दीपकचे वडील लोकेंद्रसिंह वायूदलात होते आणि ते कामानिमित्त जयपूरला असतांना दीपकने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. राहुललासुध्दा दीपकप्रमाणेच जलद गोलंदाज व्हायचे होते पण लोकेंद्रसिंह यांच्या लक्षात आले की, राहुल चेंडू चांगला वळवू शकतो म्हणून त्यांनी त्याला लेगस्पिन गोलंदाजीचे धडे घेण्यास सांगितले. दीपकने रणजी सामन्याच्या पदार्पणातच फक्त 10 धावात 8 बळी मिळवून हैदराबादला 21 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेंव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता. राहुलने 2013-14 च्या सिझनमध्ये विजय मर्चंट ट्राॕफीच्या चार सामन्यांमध्ये तीन वेळा डावात पाच बळी मिळवले. पण त्यानंतर दीपकला दुखापती व आजाराचा त्रास होत राहिला. पण 2017 पासुन हे दोन्ही बंधू आता आयपीएलमध्ये चमकत आहेत आणि त्यांनी आपआपले कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांचा विश्वास जिंकला आहे. गेल्या वर्षीतर दीपकने कोलकाता नाईट रायडर्सविरुध्दच्या सामन्यात तब्बल 20 डॉट बॉल टाकण्याचा विक्रम केला होता. त्यात डावातील 19 व्या षटकात आंद्रे रसेलसारख्या स्फोटक फलंदाजाला जखडून ठेवत त्याने पाच डॉट बाॕल टाकले होते.

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स