दुबई : सनरायजर्स हैदराबादचा सीनिअर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जांघेतील स्नायू दुखावले असून तो आयपीएलमधून ‘आऊट’ झाला आहे. त्याचप्रमाणे यंदा होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाण्याच्या त्याच्या आशा धूसर होण्याची शक्यता आहे.
२ ऑक्टोबरला येथे चेन्नई सुपरकिंग्सच्या डावात १९ व्या षटकादरम्यान भुवनेश्वरला दुखापत झाली. केवळ एक चेंडू टाकल्यानंतर तो लंगडत मैदानाबाहेर आला होता.
यंदा आतापर्यंत आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारची कामगिरी समाधानकारक होती. या वेगवान गोलंदाजाने प्रतिषटक सातपेक्षा कमीच्या सरासरीने धावा दिल्या, पण त्याला चार सामन्यांत केवळ तीन बळी घेता आले.
भुवनेश्वरची दुखापत सनरायजर्स संघासाठी मोठा धक्का असू शकते कारण संघाच्या अनुभवहीन गोलंदाजीमुळे डेथ ओव्हर्समध्ये त्यांना चांगल्या गोलंदाजाची उणीव भासेल.
दरम्यान, भुवनेश्वर यूएईमध्येच थांबण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेलसुद्धा बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीसोबत तेथेच आहेत.
केंद्रीय करारात समावेश असल्यामुळे भुवनेश्वरचे रिहॅबिलिटेशन पूर्णपणे बीसीसीआयची जबाबदारी आहे. भुवनेश्वर गेल्या वर्षभरापासून दुखापतींसोबत संघर्ष करीत आहे आणि स्नायूच्या दुखापतींमुळे तो बराच काळ संघाबाहेर राहिला. त्याने आयपीएलदरम्यान पुनरागमन केले. तो यंदा सुरुवातीला न्यूझीलंड दौºयावरही गेला नव्हता. भारताला वर्षाच्या शेवटी आॅस्ट्रेलिया दौºयात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
दुखापत कदाचित ग्रेड वन किंवा ग्रेड दोन स्वरूपाची
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘भुवनेश्वर कुमार जांघेतील स्नायू दुखावल्यामुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्याची दुखापत कदाचित ग्रेड वन किंवा ग्रेड दोन स्वरूपाची आहे. याचा अर्थ या दुखापतीमुळे तो किमान सहा ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहील. त्यामुळे कदाचित त्याला भारताच्या आॅस्ट्रेलिया दौºयातून बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.’