- एबी डिव्हिलियर्स
जर कुणी म्हटले की आयपीएल सध्या जगातील सर्वात स्पर्धात्मक व रोमांचक स्पर्धा आहे तर त्याचे उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. एका दिवसापूर्वी आठपैकी सात संघांना १४ गुणांसह साखळी फेरी संपविण्याची संधी आहे. जगभरातील लाखो चाहते या स्पर्धची रंगत अनुभवत आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गुणतालिकेत अव्वल तीन स्थानी आहेत, पण अलीकडच्या कालावधीत या तिन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या तिन्ही संघांना एक विजय प्ले-ऑफ गाठण्यास पुरेसा आहे.
त्यानंतर हे तिन्ही संघ अव्वल दोनमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील. अव्वल दोन संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतात. पण, काही सहज मिळत नाही. आम्हाला बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे तर शनिवारी आमची लढत हैदराबादसोबत होईल. त्यानंतर सोमवारी आमची लढत दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. जेतेपद पटकावण्यासाठी आम्हाला मुंबई व दिल्ली संघांचा पराभव करावा लागेल किंवा एका संघाला दोनदा पराभूत करावे लागेल. पण, चर्चा केवळ अव्वल तीनची नसून त्यापेक्षा अधिक संघांची आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघात जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटवण्यास सक्षम आहेत. पंजाब, कोलकाता, राजस्थान, हैदराबाद हे संघही विजयाची मालिका कायम राखत १० नोव्हेंबरला दुबईत खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत जेतेपद पटकावू शकतात ? हे शक्य आहे.