Join us  

IPL 2019 : हार्दिक पांड्याशी शेकहँड का नाही?; हर्षा भोगलेनं सांगितलं खरं कारण

नेटिझन्सच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 10:36 AM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला. कोलकाताचे 134 धावांचे लक्ष्य मुंबईने 9 विकेट राखून सहज पार केले. रोहित शर्मा ( 55*), सूर्यकुमार यादव ( 46*) आणि क्विंटन डी कॉक ( 30) यांनी मुंबईचा विजय पक्का केला. या सामन्यात दोन महत्त्वाचे विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, या पुरस्काराने गौरवल्यानंतर समालोचक हर्षा भोगलेकडून हार्दिकचा अपमान झाला आणि नेटिझन्सच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. 

हार्दिकने या सामन्यात कोलकाताच्या शुबमन गिल आणि ख्रिस लीन या सलामीवीरांना माघारी पाठवून मुंबईच्या अन्य गोलंदाजांचे काम सोपं केलं. त्याशिवाय त्याने एक झेलही टीपला. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. हार्दिकने 14 सामन्यांत 198.95 च्या स्ट्राईक रेटने 380 धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर 14 विकेट्सही आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर भोगलेने त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी हार्दिक म्हणाला,''गोलंदाजीच्या कामगिरीवर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे.'' 

पण, या संवादानंतर जे घडायला नको ते घडले. हार्दिकने शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा भोगलेने पाठ फिरवली. यानंतर नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया दिल्या. त्यावर भोगले म्हणाला,''सामन्यानंतर हार्दिकशी संवाद साधून आनंद झाला. त्याच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. संवाद संपल्यानंतर मला कॅमेराच्या दिशेने वळायचे होते आणि नेमके त्याचवेळी हार्दिकने शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. त्यामुळे मला त्याच्याशी हातमिळवणी करता आली नाही. आशा करतो की त्याने याचे वाईट वाटून घेतले नसावे.''कोलाकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. मुंबईने या सामन्यात कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. कोलकाता पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. हैदराबादला आता दिल्ली कॅपिटल्सचा सामना एलिमिनेटरमध्ये करावा लागणार आहे.

पाहा व्हिडीओ..https://www.iplt20.com/video/187826

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्याकोलकाता नाईट रायडर्स