Join us

IPL 2019 : पंचांच्या चुकीवर जेव्हा भडकला विराट कोहली...

शनिवारी झालेल्या सामन्यात कोहलीचा आपला राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 17:05 IST

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : यंदाच्या आयपीएलच्या हंगामामध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयांबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. पंचांच्या काही निर्णयांवर माजी क्रिकेटपटूंनी नाराजीही व्यक्त केली. पण शनिवारी झालेल्या सामन्यात तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

शनिवारी आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोहलीने आतापर्यंतच्या हंगामात प्रथमच टॉस जिंकला होता. कोहलीने टॉस जिंकून यावेळी हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने या सामन्यात झुंजार अर्धशतक झळकावले.

ही गोष्ट घडली ती पहिल्या डावाच्या अखेरच्या षटकामध्ये. हे षटक आरसीबीचा वेगवान गोलंदाज उमेश यादव टाकत होता. पहिल्या तीन षटकांमध्ये अठरा धावा दिल्या होत्या. पण अखेरच्या षटकामध्ये केनने त्याचा चांगलाच समातार घेतला. या षटकातील पाचवा चेंडू नो-बॉल असल्याचा निर्णय पंचांनी दिला. पण जेव्हा रीप्लेमध्ये हा चेंडू पाहिला तेव्हा तो नो-बॉल नसल्याचे स्पष्ट दिसत होते. हा रिप्ले पाहिल्यावर उमेश आणि कोहली यांनी मैदानावरील पंचांकडे धाव घेतली. या दोघांनी पंचांना हा नो-बॉल नसल्याचे सांगितले. पण मैदानावरील पंच नायजेल लाँग यांनी उमेश आणि कोहलीचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. त्यानंतर कोहलीचा पारा चढलेला पाहायला मिळाला. कोहलीने काही वेळ पंचांशी वाद घातला, पण पंच आपली गोष्ट मान्य करत नसल्याचे कळल्यावर मात्र कोहली क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्या जागेवर निघून गेला.

ना कोहली, ना एबी, पण तरीही जिंकली आरसीबीशिमरॉन हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. या विजयासह आरसीबीने या हंगामाचा शेवट गोड केला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डी'व्हिलियर्स यांना मोठी खेळी साकारता आली नसली तरी आरसीबीने विजय मिळवला, हे लक्षणीय ठरले.

हैदराबादच्या 176 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि एबी हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर मात्र हेटमायरने हैदराबादच्या गोलंदाजांना धारेवर धरले. हेटमायरने 47 चेंडूंत 75 धावांची दमदार खेळी साकारली. हेटमायर आणि गुरकिरत यांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी रचली. हेटमायरनंतर गुरकिरतही बाद झाला, त्याने 48 चेंडूंत 65 धावा केल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आरसीबीने हा सामना जिंकला.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद