कोलकाता, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कालचा दिवस हा विराट कोहलीचाच होता. सारे काही कोहलीला हवेहवेसे घडले. कोहलीच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं विजय मिळवला. बंगळुरूने मोइन अली आणि कोहलीच्या फटकेबाजीच्या जोरावर 213 धावांचा डोंगर उभा केला. कोलकाता नाइट रायडर्सला हे लक्ष्य पार करण्यासाठी 10 धावा कमी पडल्या. कोलकाताच्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांचा संघर्ष अपयशी ठरला.
या सामन्याच्या पहिल्या डावात एक हास्यास्पद प्रसंग घडला. बंगळुरूच्या फलंदाजीच्या वेळी 18व्या षटकात मार्कस स्टॉइनिस कोलकाताच्या सुनील नरीनचा सामना करत होता. नॉन स्ट्रायकर एंडला कोहली होता. स्टॉइनिसला गोलंदाजी करण्यासाठी पुढे आलेला नरीन यष्टिशेजारी येऊन अचानक थांबला. त्यावेळी सजग असलेल्या कोहलीने त्वरित क्रिजवर बॅट ठेवली. त्यानंतर नरीनकडे पाहून त्याने क्रिजजवळ बसून बॅट खेळपट्टीवरच ठेवली. कोहलीचे ही कृती पाहून नरीन आणि पंच यांच्यासह उपस्थित प्रेक्षकांनाही हस आवरता आले नाही. नरीन कदाचीत मांकड धावबाद करण्याचा प्रयत्नात असल्याचे कोहलीनं पंच इयान ग्लोड यांना सांगितले.
किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात मांकड धावबाद प्रकरण गाजले होते. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड धावबाद केले. त्यानंतर अश्विनवर टीका झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्याने पंजाबच्या मयांक अग्रवालला ताकीद दिली होती.