Join us

IPL 2019 : विराट कोहलीने डि'व्हिलियर्सला दिले होते 'जादूची झप्पी' देण्याचे वचन

सामन्यापूर्वी कोहलीने एबी डि'व्हिलियर्सला 'जादूची झप्पी' देण्याचे वचन दिले आणि त्याने ते सामन्यानंतर पूर्णही केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:41 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स  बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले. यंदाच्या मोसमातील कोहलीचे हे पहिले शतक ठरले. कोहलीच्या शतकाच्या जोरावर बंगळुरुने हा सामना 10 धावांनी जिंकला होता. पण या सामन्यापूर्वी कोहलीने एबी डि'व्हिलियर्सला 'जादूची झप्पी' देण्याचे वचन दिले आणि त्याने ते सामन्यानंतर पूर्णही केले.

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात डि'व्हिलियर्सला विश्रांती देण्यात आली होती. डि'व्हिलियर्स खेळत नसल्यामुळे मला शेवटपर्यंत खेळणे भाग होते. त्यावेळी मी डि'व्हिलियर्सला एक वचन दिले होते. जर मी अखेरपर्यंत खेळलो तर तुला  'जादूची झप्पी' देईन असे वचन मी डि'व्हिलियर्सला दिले होते, असे कोहलीने सामन्यानंतर सांगितले.

 मोइन आली (66) आणि विराट कोहलीच्या (100) फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी आयपीएलच्या 12व्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. बंगळुरूने विजयासाठी ठेवलेल्या 214 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सला 5 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आले. नितीश राणा (85* ) आणि आंद्रे रसेल (65 ) यांचा संघर्ष अपयशी ठरला. 

मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या. अली व कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करताना तिसऱ्या विकेटसाठी झटपट 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. कोहलीनेही 58 चेंडूंत 100 धावा केल्या. त्यात 9चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. आयपीएलमधील कोहलीचे हे पाचवे शतक ठरले.

डेल स्टेनच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसने कोलकाताच्या ख्रिस लीनचा झेल सोडला, पण स्टेनने षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला माघारी पाठवले. त्यानंतर चौथ्या षटकात नवदीन सैनीने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने सुनील नरीनला ( 18) बाद केले. स्टेनने तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिलला (9) कर्णधार कोहलीकरवी झेलबाद करून तंबूत पाठवले. कोलकाताला 6 षटकांत 3 बाद 37 धावा करता आल्या. कोलकाताच्या धावगतीला लगाम लावण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश मिळाले. नवव्या षटकात कोलकाताने अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताच्या दहा षटकांत 3 बाद 60 धावा केल्या. रॉबीन उथप्पा फार काही करू शकला नाही. त्याच्या संथ खेळीने धावा आणि चेंडू यांतील अंतर वाढवले. नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी केली. राणाने अर्धशतक झळकावले. रसेलनेहे फटकेबाजी केली,परंतु तो कोलकाताला विजय मिळवून देऊ शकला नाही. रसेलने 25 चेंडूंत 9 षटकार आणि दोन चौकार खेचत 65 धावा कुटल्या. ऱाणा 46 चेंडूंत 85 धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सआयपीएल 2019