जयपूर, आयपीएल 2019 : गोलंदाजांची दमदार कामगिरी आणि डेनिली वॅट, शेफाली वर्मा यांच्या शानदार खेळीच्या जोरावर वेलोसिटीने महिला टी२० चॅलेंजमध्ये बुधवारी ट्रेलब्लेझर्सवर १२ चेंडू आणि ३ गडी राखून विजय मिळवला.
वेलोसिटीने ११३ धावांचे लक्ष्य १८ षटकांतच ७ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. वेलोसिटीने लक्ष्याच्या जवळ पोहचल्यावर सात चेंडूत एकही धाव न करता ५ गडी गमावले. वॅटने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. १५ वर्षीय शेफालीने ३१ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. या दोघींनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार
मिताली राज हिने १७ धावा केल्या.
![]()
तत्पूर्वी वेलोसिटीने बिष्ट व एमिलिया केर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सला ११२ धावातच रोखले. बिष्टने ४ षटकांत १३ धावांत २, तर एमिलियाने तीन षटकांत २१ धावांत २ बळी मिळवले. ट्रेलब्लेझर्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तिने ४० चेंडूत ५ चौकार मारले. सलामीवीर सुजी बेट्सने २२ चेंडूत २६ धावा केल्या. वेलोसिटीची अनुभवी हेली मॅथ्युज अपयशी ठरल्यानंतर शेफालीने शकीरा सेलमन व राजेश्वरी गायकवाडविरुद्ध आक्रमक खेळ केला.
![]()
ट्रेलब्लेझर्सने पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजला २ धावांनी पराभूत केले होते. आता दोन सामन्यात त्यांचे दोन, तर एका सामन्यात वेलोसिटीचे दोन गुण झाले आहेत. वेलोसिटी आणि सुपरनोव्हाज यांच्यात गुरुवारी अखेरचा साखळी सामना खेळला जाईल, यातून अंतिम फेरीत पोहचणारे संघ निश्चित होतील. अंतिम सामना ११ मे रोजी खेळवला जाईल.
---------------------
संक्षिप्त धावफलक
ट्रेलब्लेझर्स : २० षटकात ६ बाद ११२ धावा (हरलीन देओल ४३, सुझी बेट्स २६; एकता बिष्ट २/१३, अमेलिया केर २/२१.) पराभूत वि. वेलोसिटी : १८ षटकात ७ बाद ११३ धावा (डॅनियल वॅट ४६, शेफाली वर्मा ३४; दीप्ती शर्मा ४/१४.)