IPL 2019 : हार्दिकच्या खेळीचे तेंडुलकरकडून कौतुक, पण अन्य खेळाडूंवर तीव्र नाराजी

IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 09:11 AM2019-04-29T09:11:28+5:302019-04-29T09:18:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Truly outstanding hitting from Hardik Pandya, say Sachin Tendulkar | IPL 2019 : हार्दिकच्या खेळीचे तेंडुलकरकडून कौतुक, पण अन्य खेळाडूंवर तीव्र नाराजी

IPL 2019 : हार्दिकच्या खेळीचे तेंडुलकरकडून कौतुक, पण अन्य खेळाडूंवर तीव्र नाराजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले. हार्दिक पांड्या वगळता मुंबईचे अन्य फलंदाज तगड्या आव्हानाच्या दडपणाखाली विकेट देऊन माघारी परतले.  हार्दिकने 34 चेंडूंत 6 चौकार व 9 षटकार खेचून 91 धावांची वादळी खेळी केली. पण, त्याची ही फटकेबाजी मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. मुंबई इंडियन्सचा सल्लागार आणि भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने हार्दिकच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्याने अन्य फलंदाजांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी प्रकट केली.


सलामीला बढती मिळालेल्या शुबमन गिलनं ख्रिस लीनच्या सोबतीनं कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. लीनने 29 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा चोपल्या. त्यानंतर रसेल नावाचे वादळ घोंगावलं. रसेल आणि गिल जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. गिल 45 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 76 धावांत माघारी परतला. उर्वरित षटकांत रसेरची षटकार-चौकारांच्या आतषबाजीनं इडन गार्डन दणाणून सोडलं. रसेलने 40 चेंडूंत नाबाद 80 धावा कुटल्या आणि त्यात 6 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. या त्रिकुटाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.


लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर अवघ्या 21 धावांवर माघारी परतले. सुनील नरीनच्या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात डी कॉकला झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात हॅरी गर्नीने हिटमॅन रोहितला पायचीत केले. मुंबईचे फलंदाज टप्प्याटप्प्यानं माघारी परतत असताना हार्दिक व कृणाल या पांड्या बंधूंनी थोडा संघर्ष केला. हार्दिकनं कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण, 34 धावांनी मुंबई इंडियन्सला हार मानावी लागली. मुंबईच्या या पराभवानंतर तेंडुलकरनं ट्विट केले. तो म्हणाला,''हार्दिक पांड्याची खेळी अविश्वसनीय होती, परंतु दुर्दैवाने अन्य खेळाडूंकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही. कोलकाता नाइट रायडर्सचे अभिनंदन.'' 


तत्पूर्वी, तेंडुलकरने शुबमन गिल, ख्रिस लीन आणि आंद्रे रसेल या कोलकाताच्या खेळाडूंचेही कौतुक केले होते. त्याचवेळी त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही केले होते.

(IPL 2019 : रोहित 'असं' वागणं बरं नाही; KKR विरुद्ध अखिलाडूवृत्तीचं दर्शन, Video)

Web Title: IPL 2019: Truly outstanding hitting from Hardik Pandya, say Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.