चेन्नई, आयपीएल 2019 : भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने इंडियन प्रीमिअर लीगच्या रविवारच्या सामन्यात एक भीमकाय पराक्रम केला. चेन्नई सुपर किंग्सच्या या खेळाडूने भारतीय मैदानांवर ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात 6000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम केला.
रैनाचा हा चेन्नई सुपर किंग्सकडूनचा 150वा आणि आयपीएलमधील 179 वा सामना होता. त्यात त्याने 32 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 36 धावा केल्या. 3 बाद 27 अशी दयनीय अवस्था असताना रैनाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रैनाने 36वी धाव घेताच भारतीय भूमीत 6000 धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 288 डावांत 33.16 च्या सरासरीनं 8058 धावा आहेत. आयपीएलमध्ये त्याने 175 डावांत 34.25 च्या सरासरीने 5070 धावा केल्या आहेत. त्याने 2019च्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सलामीच्या लढतीत. त्याने आयपीएलमध्ये 5000 धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला होता.
महेंद्रसिंग धोनीचा चेपॉकवर पराक्रम, चेन्नई सुपर किंग्सचा विजय
कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात धोनीने आयपीएलमधील 21वे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने नाबाद 75 धावा करताना आयपीएलमधील दुसरी सर्वोत्तम वैयक्तीक आणि चेपॉकवरील सर्वोत्तम खेळीची नोंद केली. त्याने चौथ्यांदा 70पेक्षा अधिक धावा करताना लोकेश राहुलला मागे टाकले.
आयपीएलमधील धोनीची सर्वोत्तम खेळी
79* वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मोहाली 2018
75* वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई 2019
70* वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2018
70* वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2011