ठळक मुद्देदिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, तो तरुण तडफादार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत.गेल्या काही सामन्यांत त्याला सूरच सापडत नव्हता. आता मात्र आयपीएलवर फोकस करायचं त्यानं पक्कं ठरवलंय.
जयपूर, आयपीएल 2019: राजस्थान रॉयल्सनं दिलेलं १९२ धावांचं कठीण आव्हान पार करत दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल स्पर्धेतील सातवा विजय साकारला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, तो तरुण तडफादार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत. ६ चौकार आणि ४ षटकार खेचत ३६ चेंडूत नाबाद ७८ धावांची धडाकेबाज खेळी त्यानं साकारली. पृथ्वी शॉ (४२) आणि शिखर धवन (५४) यांनी रचलेल्या पायावर रिषभनं विजयाचा कळस चढवला. गेल्या काही सामन्यांत त्याला सूरच सापडत नव्हता. तो धावांसाठी झगडताना दिसत होता. या काळात मनात काय सुरू होतं, याची प्रांजळ कबुली पंतनं कालच्या सामन्यानंतर दिली.
आयपीएलच्या यंदाच्या पर्वात दिल्लीचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होता. या सामन्यात रिषभनं २७ चेंडूत ७८ धावा फटकावल्या होत्या. १८ चेंडूत अर्धशतकाचा पराक्रम त्यानं केला होता. या खेळीनं त्याचं मनोबल उंचावण्याऐवजी, अचानक त्याची कामगिरी घसरतच गेली होती. त्यामागचं कारण पंतने सांगितलं.
![]()
'खोटं नाही सांगत, माझ्या मनात वर्ल्ड कप संघनिवडीचे विचार घोळत होते. पण, ते बाजूला सारून मी खेळावर लक्ष केंद्रीत केलं. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि आज त्याचं फळही मला मिळालं. तुमचा संघ महत्त्वाचा सामना जिंकतो, तेव्हा आनंद होतोच. मला खूप भारी वाटतंय', अशा भावना रिषभ पंतनं व्यक्त केल्या. खेळपट्टी कशी आहे, हे मला नेमकं कळलं होतं आणि त्याचाच फायदा झाला, असंही त्यानं सांगितलं.
![]()
२०१९च्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. या संघात पर्यायी यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आलीय. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. हेच विचारचक्र पंतच्या डोक्यातही फिरत होतं आणि त्यामुळेच त्याला सूर सापडत नव्हता. आता मात्र आयपीएलवर फोकस करायचं त्यानं पक्कं ठरवलंय. दुसरीकडे, पंतच्या कालच्या झंझावाती खेळीनंतर, वर्ल्ड कप संघनिवडीवरून नेटकरी निवड समितीवर बाऊन्सर, यॉर्करचा मारा करत आहेत.
वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियात अजिंक्य रहाणेचाही समावेश झालेला नाही. तसं तर तो बऱ्याच काळापासून वनडे संघात नव्हताच. तरी, अनुभवाच्या जोरावर वर्ल्ड कपसाठी त्याचा विचार व्हायला हवा होता, असं अनेकांना वाटतं होतं. त्यांच्या या मताला काल बळ मिळालं. कारण, रहाणेनं दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक साजरं केलं. ११ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत त्यानं ६३ चेंडूत १०५ धावा केल्या. या शतकाच्या जोरावरच
राजस्थान रॉयल्सनं १९१ धावांचा डोंगर रचला होता.
![]()
राजस्थान रॉयल्सवरील विजयानंतर दिल्लीनं धावगतीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. हा क्रमांक पुन्हा मिळवायचा असेल तर चेन्नईला आजचा हैदराबादविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.