Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : कॅप्टन कूल चुकीचा पायंडा पाडतोय, धोनीच्या कृत्यावर माजी खेळाडूंची सडकून टीका

IPL 2019 RRvsCSK : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रुद्रावतार पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:34 IST

Open in App

जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रुद्रावतार पाहायला मिळाला. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीला असे वागताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या, अनेकांना तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत धोनीने चक्क मैदानावर धाव घेतली आणि पंचांशी हुज्जत घातली. या कृत्यावर त्याला दंडही ठोठावण्यात आला. त्याचबरोबर अनेक माजी खेळाडूंनी धोनीवर सडकून टीका केली आहे. 

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि पंचांचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र पंचांनी हात आखडता घेत नो बॉलचा निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला धोनी मैदानात घुसत पंचांना या कृतीचा जाब विचारला. चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी  स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला. यामुळे पंचांनी नो बॉलची खून केली. मात्र, दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. धोनी क्लीन बोल्ड होऊन नुकताच मैदानाबाहेर गेला होता.  

धोनीच्या या वागण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ, भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा व संजय मांजरेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मायकल वॉन म्हणाला,''धोनीचं हे वागणं खेळासाठी मारक आहे. कर्णधार धोनीचे असे पिचवर येणे, यावर विश्वास नाही बसत. तो महेंद्रसिंग धोनी आहे आणि तो त्याच्या देशात काहीही करू शकतो, परंतु डग आउटमधून थेट मैदानावर येत पंचांकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. हे कृत चुकीचे आहे.'' ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ म्हणाला,''आयपीएलमधील संघ मालकांचा दबाव आणि पैसा हे मी समझू शकतो. मात्र, आयपीएलमधील दोन घटनांनी मला विचलित केले आणि या दोन्ही घटनांत आर अश्विन आणि महेंद्रसिंग धोनी हे कर्णधार आहेत. क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट नाही.''संजय मांजरेकरनेही नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''मी नेहमी धोनीची प्रशंसा करत आलो आहे, परंतु त्याचे असे वागणे चुकीचे आहे. तो नशिबवान आहे, केवळ दंड भरून त्याची या प्रकरणातून सुटका झाली.'' भारताचा माजी फलंदाज आशाक चोप्राने पंचांच्या कामगिरीकडेही लक्ष वेधले. पण, त्याचवेळी त्यांनी धोनी चुकीचा पायंडा पाडत असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स