बंगळुरू, आयपीएल 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलच्या 12व्या मोसमात पाच सामन्यानंतरही विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत इभ्रत वाचवण्यासाठी कोहलीचा संघ घरच्या मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोहली संघात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
![]()
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या 21 सामन्यांत बंगळुरूने जय-पराजयाच्या आकडेवारीत 14-6 अशी आघाडी घेतली आहे. 2011नंतर दिल्लीविरुद्ध झालेल्या 15 सामन्यांत बंगळुरूने 13 विजय मिळवले आहेत. त्यामुळे बंगळुरूचे पारडे जड वाटत असले तरी दिल्लीचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे 12व्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूच्या संघात बदल पाहायला मिळेल.
![]()
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 205 धावा करूनही बंगळुरूला हार मानावी लागली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात उमेश यादवला संधी देण्यात येईल. त्याच्यासाठी मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कोलकाताविरुद्ध सिराजने गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात खूप चुका केल्या होत्या. मोईन अलीच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते आणि चौथा परदेशी खेळाडू म्हणून शिमरोन हेटमायर संघात सहभागी होईल.
![]()
- या सामन्यात अमित मिश्राने एक विकेट घेताच विक्रम होणार आहे. लसिथ मलिंगानंतर आयपीएलमध्ये 150 विकेट घेणारा तो दुसरा आणि भारताचा पहिलाच गोलंदाज ठरणार आहे.
- एबी डिव्हिलियर्सला आयपीएलमध्ये 200 षटकारांचा विक्रम करण्यासाठी तीन षटकारांची गरज आहे. ख्रिस गेलनेच आयपीएलमध्ये 200 षटकार खेचले आहेत.
- बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली विरुद्ध 761 धावा चोपल्या आहेत आणि दिल्लीविरुद्धची ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
RCB चा संभाव्य संघ : पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), विराट कोहली (कर्णधार) , एबी डिव्हिलियर्स, शिमरोन हेटमायेर मार्कस स्टोइनिस, अक्षदीप नाथ, पवन नेगी, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव किंवा टिम साउदी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.