Join us

IPL 2019 RCB vs DC : विराटची संथ खेळी, बंगळुरूच्या 149 धावा

IPL 2019 RCB vs DC: कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 17:44 IST

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.  

ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला जीवदान मिळाले. मॉरिसने टाकलेला चेंडू तिसऱ्या स्लीपमधून मारण्याचा कोहलीनं प्रयत्न केला, परंतु तेथे उभ्या असलेल्या शिखर धवनच्या हातातून झेल सुटला. पण, षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करून मॉरिसने दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. मॉरिसने 9 चेंडूंत 9 धावा केल्या. पटेल माघारी परतल्यानंतर कोहली व एबी डिव्हिलियर्स यांनी बंगळुरूच्या डावाला आकार दिला. या दोघांना मोठे फटके मारण्यापासून दिल्लीच्या गोलंदाजांनी रोखले आणि त्यामुळेच बंगळुरूला पॉवर प्लेमध्ये 2 बाद 40 धावा करता आल्या. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडाने डिव्हिलियर्सला माघारी पाठवले. डिव्हिलियर्सने 16 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकारासह 17 धावा केल्या. कॉलीन इंग्रामने त्याचा अप्रतिम झेल घेतला.

 सलग पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. पण, कोहली व मार्कस स्टॉइनिसने संयमी खेळ केला. या दोघांनी पहिल्या 10 षटकांत 2 बाद 64 धावांपर्यंत संघाला मजल मारून दिली. 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने ही जोडी फोडली. त्याने स्टॉइनिसला 15 धावांवर माघारी पाठवले. पण, त्यानंतरच्या अक्षरच्या षटकात मोइन अली व कोहलीनं 11 धावा चोपल्या. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अलीने डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला आणि दोन धाव घेतल्या. दुसरी धाव घेत असताना रिषभ पंतने अलीला धावबाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाइलची कॉपी केली. पण, त्याचा चेंडू स्टम्पच्या जळपासही जाऊ शकला नाही. इशांत शर्माच्या त्या षटकात बंगळुरूने 14 धावा काढल्या. अलीने 15व्या षटकात संदीप लामिचानेच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून बंगळुरूला शतकी वेस ओलांडून दिली. पण, पुन्हा पुढे जाऊन फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि रिषभ पंतने त्याला यष्टिचीत केले. अलीने 18 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 32 धावा केल्या. संदीपची ही ट्वेंटी-20 सामन्यांतील 50वी विकेट ठरली. 18 वर्षीय संदीपने 40 सामन्यांत 19.46 च्या सरासरीने 50 विकेट घेतल्या आहेत. याच सामन्यात अक्षर पटेलनेही विकेटचे शतक पूर्ण केले. कोहली एका बाजूनं संयमी खेळी करून विकेट टिकवून होता. त्यामुळे त्याच्याकडून अखेरच्या षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती आणि त्याने 17 व्या षटकात त्याचा ट्रेलर दाखवला. संदीपच्या त्या षटकात कोहलीनं 19 धावा चोपल्या.

पण, पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन माघारी परतला. कोहलीने 33 चेंडूंत 41 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. त्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर अक्षदीप नाथही ( 19) माघारी परतला. अखेरच्या चेंडूवर पवन नेगीही बाद झाला. त्यानंतर बंगळुरूला फार धावा जोडता आल्या नाही. मोहम्मद सिराज विचित्र पद्धतीने बाद झाला.  

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदिल्ली कॅपिटल्सविराट कोहली