नवी दिल्ली, आयपीएल 2019 : फिरोज शाह कोटला मैदानावर शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगमधील थरारक सामना रंगला. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला आणि त्यात यजमानांनी 3 धावांनी विजय मिळवला. कोलकाताने विजयासाठी ठेवलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला 185 धावाच करता आल्या. अखेरच्या षटकांत विजयासाठी आवश्यक असलेल्या 6 धावा बनवण्यात दिल्लीला अपयश आले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
या सामन्यात
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर
पृथ्वी शॉ नर्व्हस 90 चा शिकार ठरला. त्याला 99 धावांवर माघारी जावे लागले. पृथ्वीनं 55 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांच्या मदतीनं 99 धावा केल्या. मात्र, ल्युकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात झेल देऊन माघारी परतला. 19 वर्ष आणि 141 दिवसांच्या पृथ्वीला या एका धावेमुळे 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडता आला नाही. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या खेळाडूच्या विक्रमाने त्याला हुलकावणी दिली.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शत करण्याचा विक्रम मनीष पांडेच्या नावावर आहे. मनीषने 21 मे 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेक्कन चार्जर्सविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो फक्त 19 वर्ष 253 दिवसांचा होता. एक संधी हुकली असली तरी पृथ्वी अजूनही हा विक्रम मोडू शकतो.
आयपीएलच्या इतिहासात एका धावेनं शतक हुकणारा पृथ्वी हा तिसरा खेळाडू ठरला. याआधी सुरेश रैना आणि विराट कोहली यांना 99 धावांवर समाधान मानावे लागले होते. पण, रैना 99 धावांवर नाबाद राहिला होता. आणखी एक योगायोग असा की विराट कोहली आणि पृथ्वी शॉ यांना फिरोज शाह कोटला मैदानावरच 99 धावांवर माघारी परतावे लागले.
सुरेश रैना ( चेन्नई सुपर किंग्स) - 99* वि. हैदराबाद, 2013
विराट कोहली ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - 99 वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2013
पृथ्वी शॉ ( दिल्ली कॅपिटल्स) - 99 वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2019
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/158378/prithvi-s-shaw-ndar-99-55-?tagNames=indian-premier-league