Join us  

IPL 2019 : अनिल कुंबळेनं सांगितलं, 'विराट'सेनेचं काय चुकलं!

IPL 2019: जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये स्थान पटाकवणाऱ्या विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:03 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये स्थान पटाकवणाऱ्या विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला (RCB) आयपीएलच्या 12व्या मोसमात तळाला समाधान मानावे लागले. RCBला सलग सात सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी 14 सामन्यांत 5 विजय मिळवले. त्यांना सलग तिसऱ्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे. 

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने RCBच्या अपयशामागचे कारण सांगितले. तो म्हणाला,''RCBची संघनिवड चुकली. त्यांनी अंतिम संघात केवळ तीनच परदेशी खेळाडूंना खेळवलं. त्यांच्या फलंदाजीची बाजू पूर्णपणे एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यावरच अवलंबुन होती. या दोघांच्या अपयशानंतर अन्य फलंदाजांना आपली कामगिरी बजावण्यात अपयश आले. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचे, तर त्यांच्या वरिष्ठ गोलंदाज उमेश यादवला सातत्य राखता आलेले नाही."  

तो पुढे म्हणाला,''युजवेंद्र चहलची कामगिरी चांगली झाली, परंतु विजयपथावर परतले असताना मोइन अली आणि मार्कस स्टॉइनिस यांचे माघारी जाण्याचा संघाला मोठा फटका बसला. डेल स्टेन उशीरा दाखल झाला आणि त्याने आपला प्रभावही पाडला, परंतु त्यालाही दुखापतीने कवटाळले.''

या स्पर्धेपूर्वी RCBनं सिमरोन हेटमायर, शिवम दुबे आणि अक्षदीप नाथ यांच्यासाठी पैसा ओतला, परंतु या नव्या खेळाडूंना अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. पण, नवदीप सैनी आणि यष्टिरक्षक पार्थिव पटेल यांची सातत्यपूर्ण कामगिरी ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. तो म्हणाला,''नवदीन सैनीकडे ट्वेंटी-20 लीगमध्ये उत्तम गोलंदाजी करण्याचे अस्त्र आहे. हेटमायरने अखेरच्या सामन्यात धडाका उडवला आणि गुरकिरत हा आगामी हंगामसाठी मधल्या फळीत उत्तम पर्याय ठरू शकतो. सलामीला पार्थिव पटेल हा सक्षम पर्याय आहे.''

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीअनिल कुंबळेपार्थ पवार