Join us

IPL 2019 : 28 ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूमुळे दिल्लीची ताकद वाढली

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी पहिल्याच सामन्यात विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:10 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी पहिल्याच सामन्यात विजय मिळवत इंडियन प्रीमिअर लीगची धडाक्यात सुरूवात केली. चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा, तर दिल्लीनं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण, चेन्नईला विजयासाठी 71 धावाच करायच्या होत्या, तर दिल्लीनं 213 धावा चोपल्या. त्यामुळे आज फिरोज शाह कोटलावर होणाऱ्या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज विरुद्ध दिल्लीचे फलंदाज असे युद्ध पाहायला मिळेल. दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 27 चेंडूंत 78 धावा चोपल्या होत्या. पंतचे हे वादळ रोखण्यासाठी चेन्नईनं कंबर कसली आहे, परंतु दिल्लीने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे आणि त्यामुळे दिल्लीचे पारडे जड झाले आहे.फिरोज शाह कोटलावर होणाऱ्या या सामन्यात दिल्ली बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, आकड्यांवर नजर टाकल्यास चेन्नईची बाजू भक्कम आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 18 सामने झाले आहेत आणि महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 12 विजय मिळवले आहेत, तर दिल्लीला केवळ सहाच सामने जिंकता आलेत. चेन्नईला सलामीच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांनी बंगळुरूचा संपूर्ण संघ 70 धावांवर माघारी पाठवला होता. चेन्नईने हे लक्ष्य 7 विकेट्स राखून सहज पार केले होते.यंदाचा दिल्ली संघ बलाढ्य दिसत आहे. मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या प्रतिस्पर्धींविरुद्ध त्यांनी पहिल्याच सामन्यात 213 धावांचा डोंगर उभा केला होता. शिखर धवन ( 43), कॉलीन इंग्राम ( 47) आणि रिषभ पंत ( 78) यांची बॅट चांगलीच तळपली होती. गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना मुंबईला 176 धावांत गुंडाळले. त्यात चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचे मनोबल उंचावण्यासाठी 28 ऑलिम्पिक पदकं नावावर असलेला अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर याबाबतची घोषणा केली आहे. 

 

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सआयपीएल 2019आयपीएलचेन्नई सुपर किंग्स