Join us  

IPL 2019 : नेपाळच्या 18 वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, शाहिद आफ्रिदीलाही टाकले मागे  

IPL 2019 : नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिछाने याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 10:12 AM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. पंजाबने नाट्यमयरित्या हा सामना जिंकला, सॅम कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्याचे वैशिष्ट ठरली. पण, दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा नेपाळचा युवा फिरकीपटू संदीप लामिछाने याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकण्याचा पराक्रम केला.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात संदीपने दोन विकेट घेतल्या आणि 2019 मध्ये त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 27 विकेट घेण्याचा पराक्रम केला. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि बांगलादेशचा शकिब अल हसन या दिग्गजांना मागे टाकले.  

संदीपनंतर यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत आफ्रिदीचा क्रमांक येतो. त्याने 2019 मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या रशीद खानच्या नावावर 25 आणि शकिबच्या नावावर 24 विकेट्स आहेत. रिषभ पंत ( 39) आणि कॉलीन इंग्राम ( 38)  यांच्या 62 धावांच्या भागीदारीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवावा लागला. 21 चेंडूंत 24 धावांची गरज असताना दिल्लीचे सात फलंदाज शिल्लक होते, परंतु तरीही किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी सामना जिंकला. दिल्लीचे 7 फलंदाज अवघ्या 17 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतले. मोहम्मद शमी ( 2/27) आणि सॅम कुरन ( 4/11) यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला. कर्णधार रवीचंद्रन अश्विन यानेही दोन विकेट घेतल्या. पण, कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्यात चर्चेचा विषय ठरली.  

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता दिल्ली कॅपिटल्सची एकेकाळी 3 बाद 144 अशी मजबूत स्थिती होती. पण त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी कच खाल्ली आणि सहज जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 166 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 152 धावा करता आल्या आणि पंजाबने हा सामना 14 धावांनी जिंकला.  

टॅग्स :आयपीएल 2019नेपाळशाहिद अफ्रिदीदिल्ली कॅपिटल्सकिंग्ज इलेव्हन पंजाब