Join us  

IPL 2019 : मुंबई, चेन्नई विजेतेपदाचे दावेदार

प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेल्या चारही संघांना आयपीएल विजयाची संधी आहे. हे चारही संघ तुल्यबळ आहे. मात्र ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने गेल्या काही सामन्यात आपली कामगिरी उंचावली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:58 AM

Open in App

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेल्या चारही संघांना आयपीएल विजयाची संधी आहे. हे चारही संघ तुल्यबळ आहे. मात्र ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने गेल्या काही सामन्यात आपली कामगिरी उंचावली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. मुंबई इंडियन्स येथेपर्यंत पोहचेल असे वाटत नव्हते. रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. मात्र नंतर पोलार्ड, हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंग्जने या आयपीएलमध्ये लक्षवेधक कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोन संघ आयपीएल जिंकण्याचे सर्वात जास्त दावेदार असतील.पहिला प्ले आॅफ चेन्नई येथे होत असल्यामुळे त्याचा फायदा सुपरकिंग्जला होण्याची शक्यता आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्ी ही फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल फिरकीपटूंच्या कामगिरीवर असणार आहे. चेन्नईकडे सर्वात चांगले फिरकीपटू असल्याने त्यांच्याकडे जिंकण्याची संधी आहे. मात्र चेन्नई सुपरकिंग्जचे सर्वाधिक खेळाडू वयाची ३५ ओलांडलेले आहेत. या मोठ्या स्पर्धेत या टप्प्यावर त्यांचे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष आहे.केदार जाधवची दुखापत विराट कोहली, रवि शास्त्री यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. केदार आयपीएलच्या अन्य सामन्यात खेळणार नाही. मात्र विश्वचषक स्पर्धेसाठी केदार शंभर टक्के तंदुरुस्त असेल तरच त्याचा समावेश होईल.मात्र जर तो तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी कोणता खेळाडूची निवड करायची हा मोठा प्रश्न असणार आहे. केदार फलंदाजीबररोबर गोलंदाजीही करतो. त्यामुळे तशाच पध्दतीचा खेळाडू भारतीय संघाला गरजेचा आहे.वेस्ट इंडिजचा संघ प्रत्येक सामन्यागणिक मजबूत होत आहे. आयर्लंडसारख्या दुबळ्यासंघाविरुद्ध जरी त्यांनी विक्रमी कामगिरी केलेली असली तरी विंडिजकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मागील काही दिवसांत विडिंजने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केलेली आहे.इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानला पराभूत केले. मात्र २०१५ नंतर इंग्लंडने आपल्या कामगिरीत खूपच सुधारणा केलेली आहे. सध्या हा संघ नंबर वन आहेच. त्याचबरोबर त्यांना विश्वचषक स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळण्याचाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेत माझ्या मते आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत व न्यूझीलंड हे चार संघ उपांत्यफेरीत पोहचतील.न्यूझीलंडकडे सध्या कोणाचे लक्ष नाही. मात्र, हा संघ खूपच संतुलित वाटतो. त्यांच्या संघात तरुण व अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. दक्षिण आफ्रिकेकडे सध्या चांगले फलंदाज नाहीत. त्याचबरोबर त्यांचे दोन महत्त्वपूर्ण गोलंदाज कासिगो रबाडा व डेल स्टेन यांना दुखापत झाल्याने त्यांचे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे निश्चित नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ डेल स्टेनच्या गोलंदाजीवर खूप अवलंबून असतो.जर डेल स्टेन या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही तर आफ्रिकेला हा मोठा धक्का असेल.या चार संघाबरोबरच वेस्ट इंडिजच्या कामगिरीकडे लक्ष असेल. या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी सर्वांनाच आर्श्चयचकीत करणारी असेल. त्यांच्याकडे मोहमद शदाब, राशिद खान, नबी यासारखे स्टार खेळाडू आहेत. या संघाविरुद्ध जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल.

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स