IPL 2019 KKR vs RCB : कोहलीचा 'विराट' महिमा, आयपीएलमध्ये असा पराक्रम होणे नाही
कोलकाता, आयपीएल 2019 : मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या. अली व कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करताना तिसऱ्या विकेटसाठी झटपट 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. कोहलीनेही 58 चेंडूंत 100 धावा केल्या. त्यात 9चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. आयपीएलमधील कोहलीचे हे पाचवे शतक ठरले.
मोइन अलीने खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी फार वेळ न घेता फटकेबाजी सुरू केली. या फटकेबाजीमुळे कोहली व अली यांनी 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. कोहलीने 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. कोहलीचे हे आयपीएलमधील 37वे अर्धशतक ठरले. त्याने यासह गौतम गंभीर व सुरेश रैना यांच्या प्रत्येकी 36 अर्धशतकांचा विक्रम मोडला. पुढच्याच षटकात अलीनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूंत ही अर्धशतकी खेळी केली. त्याने कुलदीप यादवने टाकलेल्या 16व्या षटकात 27 धावा चोपल्या, परंतु त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला.
प्रसिधने त्याचा झेल टिपला. मोइन अलीनं आयपीएलमध्ये पाचवे जलद अर्धशतक झळकावले. या विक्रमात रिषभ पंत ( 17) आघाडीवर आहे. कुलदीपने चार षटकांत 59 धावा दिल्या. आयपीएलमध्ये फिरकीपटूने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. इम्रान ताहीरने 2016मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 59 धावा दिल्या होत्या. अली आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. अली माघारी फिरल्यानंतर कोहलीच्या आतषबाजीनं इडन गार्डन गाजवले. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 213 धावा केल्या. बंगळुरूने 14 ते 19 या षटकांत एक विकेट गमावत 100 धावा चोपल्या. कोहलीने 57 चेंडूंत शतक पूर्ण केले.
या खेळीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच शतकं करणारा कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला. शिवाय एकाच संघाकडून सर्वाधिक 5326 धावांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याच्या आसपासही कुणी नाही.