Join us  

IPL 2019 : आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची झाली ही अवस्था, वर्ल्डकप खेळेल असे वाटते का...

आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची ही अवस्था झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 7:36 PM

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : आयपीएल महत्वाची कि देश, या प्रश्नाचे उत्तर अजूनही भारताच्या खेळाडूंना समजले नसल्याचेच दिसत आहे. कारण आता काही महिन्यांवर विश्वचषक स्पर्धा येऊन ठेपली आहे. पण तरीही भारतीय खेळाडूंना विश्वचषकाचे महत्व पटलेले दिसत नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण ठरत आहे जसप्रीत बुमरा. कारण त्याच्या खांद्या दुखापत झाली होती. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ज्यांनी बुमराला पाहिले त्यांना धक्काच बसला होता आणि त्यानंतर आयपीएलच्या अट्टाहासापायी बुमराची ही अवस्था झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

मुंबईच्या पहिल्याच सामन्यात बुमराच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बुमराच्या विश्वचषक खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण तरीही त्याला दुसऱ्याच सामन्यात खेळवण्याचा अट्टाहास मुंबईच्या संघाकडून पाहायला मिळाला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तर बुमराचे डोळे सुजल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर डोळ्याच्या खाली काळी वर्तुळंही पाहायला मिळाली. त्यामुळे बुमरा अशा बिकट परिस्थितीतही बुमरा का खेळतोय, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आतापर्यंत धडाधड चालणारी चेन्नई एक्सप्रेस अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. आतापर्यंत चेन्नईने तिन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. पण चौथ्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 133 धावा करता आल्या. मुंबईने हा सामना ३७ धावांनी जिंकला. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले, तर हार्दिक पंड्याने दमदार अष्टपैली कामिगरी केली. मुंबईचा हा दुसरा विजय, तर चेन्नईचा पहिला पराभव ठरला. मुंबईचा हा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला.

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईने पहिल्या दोन षटकांत आपले दोन्ही सलामीवीर गमावले. सुरेश रैनाचा अप्रतिम झेल किरॉन पोलार्डने पकडला. चेन्नईची ३ बाद ३३ अशी अवस्था होती. त्यानंतर धोनी आणि केदार जाधव यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. पण धोनीला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. हार्दिक पंड्याने धोनीला बाद केले. धोनी बाद झाल्यावर केदारने आपले अर्धशतक झळकावले.

चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि त्याची कृणाल पंड्याबरोबरच्या भागीदारीमुळे मुंबईला ही सन्मानजक धावसंख्या उभारता आली. मुंबईचा डाव यावेळी सूर्यकुमार यादवने सावरला. त्याने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकार लगावत ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याबरोबर अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. हार्दिकने आठ चेंडूंत नाबाद २५ आणि पोलार्डने सात चेंडूंमध्ये नाबाद नाबाद १७ धावा फटकावल्या.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, पण त्यांना आश्वासक सुरुवात करता आली नाही. क्विंटन डी'कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डी'कॉकला चार धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही काही वेळात बाद झाला, त्याने १३ धावा केल्या. .युवराज सिंगही यावेळी चार धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पंड्याने ३२ चेंडूंत ४२ धावा केल्या. 

टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019