नवी दिल्ली, आयपीएल 2019 : शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला. दिल्लीनं विजयासाठी ठेवलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने सहा विकेट्स राखून पार केले. फिरोज शाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्सचे पाठीराखे अधिक होते, परंतु हजारोंच्या संख्येने असलेल्या चाहत्यांमध्ये चेन्नईच्या एकाच चाहतीनं सर्वांचे लक्ष वेधले. ती चाहती म्हणजे कॅप्टन कूल धोनीची कन्या झिवा धोनी...स्टॅण्ड्समध्ये उभी राहून झिला 'पप्पा, पप्पा' असे चिअर करत होती. चेन्नई सुपर किंग्सने झिवाचा तो व्हिडीओ शेअर केला आहे.
शिखर धवनच्या ( 51) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 147 धावा चोपल्या. पृथ्वी शॉ आणि धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ड्वेन ब्राव्होन 33 धावा देत दिल्लीचे 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 147 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या रिषभ पंतला ( 25) ब्राव्होने बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( 44) आणि सुरेश रैना ( 30) यांनी चेन्नईचा डाव सावरला. केदार जाधव ( 27) आणि धोनी ( 32) यांनीही दमदार खेळी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
''पहिल्या डावात चेंडू अपेक्षेपेक्षा अधिक वळण घेत होता. दुसऱ्या डावात खेळपट्टीवर दव आल्यामुळे फलंदाजांना मदत मिळाली. दिल्लीला 150च्या आत रोखून गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. त्यामुळे फलंदाजांचे काम हलके झाले,'' असे धोनी म्हणाला.