Join us  

IPL 2019 Final : रोहित शर्मा अखेरचं षटक हार्दिकला देणार होता, पण... 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक चार जेतेपद आता मुंबई इंडियन्सच्या नावावर जमा झाली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:49 AM

Open in App

हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक चार जेतेपद आता मुंबई इंडियन्सच्या नावावर जमा झाली आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाट्यमयरित्या सामन्यात पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्सला एका धावेने हार मानण्यास भाग पाडले. आयपीएलच्या 12व्या मोसमात मुंबई इंडियन्सने चारही सामन्यांत चेन्नईला पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला. अंतिम सामन्याचा नायक ठरला तो लसिथ मलिंगा. त्याने अखेरच्या षटकात टिच्चून मारा करताना चेन्नईला हार मानण्यास भाग पाडले. पण, हे अखेरचे षटक मलिंगाने न टाकता हार्दिक पांड्यानं टाकलं असतं तर काय झाले असते? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्या डोक्यात हा विचार आलेला.. पण, त्यानं तसं केलं नाही.

मुंबईच्या 149 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने दमदार खेळ केला. त्याने अखेरपर्यंत खिंड लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. रोहितकडे मलिंगा आणि पांड्या हे दोन पर्याय उपलब्ध होते. पांड्यानं त्याच्या एका षटकात 3 धावा दिल्या होत्या, तर मलिंगाने तिसऱ्या षटकात 20 धावांची खैरात वाटली होती. त्यामुळे हे अखेरचं षटक कोणाला द्यायचे या बुचकळ्यात रोहित पडला होता. सुरुवातीचा त्याचा कल पांड्याकडे झुकलेला, परंतु त्याने निर्णय बदलला आणि मलिंगाच्या हाती चेंडू सोपवला. त्यानंतर काय घडले हे माहितच आहे.

रोहित म्हणाला,''मलिंगा हा चॅम्पियन आहे... त्याने तिसऱ्या षटकात 20 धावा दिल्या होत्या, तरीही माझा त्याच्यावर संपूर्ण विश्वास होता. त्यानेही अंतिम षटकात चांगली गोलंदाजी करण्याचा विश्वास व्यक्त केला. पण, एकवेळ मला हार्दिकला हे षटक द्यावे असे वाटले होते, परंतु मलिंगाने यापूर्वीही आम्हाला असे थरराक विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेणे, कठीण नव्हते. कर्णधार म्हणून मी प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन शिकत आहे. पण, या विजयाचे श्रेय मलिंगाला द्यायलाच हवं.''

मुंबई इंडियन्सच्या 8 बाद 149 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 7 बाद 148 धावाच करता आल्या. ''आम्ही यंदाच्या मोसमात चांगला खेळ केला. प्ले ऑफमध्ये अव्वल दोघांत स्थान मिळवल्यानंतर आत्मविश्वास अधिक उंचावला. या यशस्वी प्रवासाचे श्रेय सर्वांना. मैदानावर खेळणाऱ्या अकरा खेळाडूंसह आमच्या पाठीशी उभ्या असलेल्या प्रत्येकाचे हे यश आहे. आमच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करायला हवं." 

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सरोहित शर्मालसिथ मलिंगाहार्दिक पांड्याचेन्नई सुपर किंग्स