Join us

IPL 2019 : KKRच्या कर्णधारपदावरून दिनेश कार्तिकची हकालपट्टी? प्रशिक्षक कॅलिसनं दिलं उत्तर

IPL 2019 : कोलकाता नाइट रायडर्स संघाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 15:05 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्स संघाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. कोलकाताच्या या हाराकिरीमुळे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे कार्तिकची कोलकाताच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात येण्याची चर्चा सुरू आहे. पण, कार्तिकला हटवण्याची कोणतीही चर्चा न झाल्याचे मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने स्पष्ट केले. राजस्थान रॉयल्स संघाने निराशाजनक कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेकडून कर्णधाराची जबाबदारी काढून घेतली, त्याच प्रकारे KKRही कार्तिकला हटवण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नावर कॅलिस म्हणाला,'' या विषयावर आम्ही चर्चा केलेली नाही आणि कोणीही हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ उरत नाही.'' 

कॅलिस पुढे म्हणाला,''संघासाठी कार्तिक मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा आहे. संघाच्या पुढील वाटचालीसाठी हेच महत्त्वाचे आहे.'' कार्तिकने आतापर्यंत 9 डावांत 16.71च्या सरासरीनेच धावा केल्या आहेत. संघमालक शाहरुख खानने संघातील काही वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत तो म्हणाला,''माझे त्यांच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. आमची भेट आज होईल आणि त्यात आम्ही सामन्याची रणनीती ठरवू.'' 

कोलकाताने पहिल्या पाच सामन्यांत चार विजय मिळवत दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर त्यांची गाडी रुळावरुन घसरली. त्यांना सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला. संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रॉबीन उथप्पाही सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. कोलकाता 10 सामन्यांत चार विजयासह 8 गुणांची कमाई करत सहावे स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठई त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकावे लागणार आहेत. 

खचलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला गौतम गंभीरची साथ कोलकाता संघाच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता KKRचा  माजी कर्णधार गौतम गंभीर धावला आहे. भारतीय संघाच्या माजी खेळाडूने सोशल मीडियावर KKR साठी विशेष मॅसेज पाठवला आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएलची दोन जेतेपदं नावावर केली. मात्र, सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या गंभीरला संघाने बाहेर केले. तरीही गंभीरनं KKRला मनातून दूर केलेले नाही. संघाची अवस्था पाहून त्याने खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कोलकाताचे आणखी चार सामने शिल्लक आहेत आणि त्यात दमदार कामगिरी करून विजय मिळवा, असा सल्ला गंभीरने दिला आहे. गंभीरने यावेळी कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. 

टॅग्स :आयपीएल 2019दिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्स