- अयाझ मेमन
चेन्नई सुपरकिंग्सला आरसीबीविरुद्ध अवघ्या एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, हा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जिंकला. ज्यांनीही हा सामना पाहिला असेल त्यांना प्रत्येकाला धोनीचे कौतुक करावेसे वाटत असेल. धोनीच्या अशा अफलातून खेळीनंतरही त्यांना केवळ एका धावेने सामना गमवावा लागला याचे अनेकांना दु:खही झाले. शेवटच्या षटकात २६ धावा काढणे हे अशक्यप्राय असे आव्हान होते. असे असतानाही त्याने २४ धावा फटकावल्या. या खेळीतून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना मात्र जबर उत्तर मिळाले.
धोनीमध्ये ताकद उरली नाही, तो फॉर्ममध्ये नाही, त्याच्यातील मॅचफिनिशर कुठे दिसत नाही, अशी टीका त्याच्यावर केली जात होती. विश्वचषकासाठी त्याच्या या खेळीची तुलना केली जाईल, हे मी म्हणत नाही; कारण टी२० हा खेळ वेगळा आहे. परंतु, धोनी ज्या पद्धतीने खेळलाय त्यावरून त्याच्यातील क्षमता कुठेही कमी झालेली नाही हे मात्र स्पष्ट दिसून आले. कारण जगात असे फार कमी खेळाडू आहेत जे अशा प्रकारची फटकेबाजी करू शकतात. एक षटकार, तर त्याने स्टेडियमबाहेर लगावला. त्या शॉटमध्ये टायमिंग आणि ताकद होती. तो पॉवर हिटिंग, प्लेसमेंट व शांत आणि संयमी सुद्धा खेळू शकतो. सर्वात महत्त्वाचे असे दिसून आले की त्याने संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली होती.
विराट लय पकडतोय...
कर्णधाराचा विचार केला तर विराट कोहलीवर त्याचे चाहते नाराज आहेत. मात्र, संघाची कामगिरी ही केवळ कर्णधारावर अवलंबून नसते. त्याच्या संघात कोणते खेळाडू आहेत यावर बरेच अवलंबून असते. सामने जिंकत नसल्याची टीका विराटवर होत आहे. मात्र, त्याने सलग दोन सामने जिंकून दिले. चेन्नईविरुद्धचा सामना अटीतटीचा झाला. मात्र, विराटने उमेश यादववर विश्वास ठेवत त्याला गोलंदाजी सोपविली होती. त्यावेळी विराट काहीच करू शकत नव्हता. संघाला जिंकून देण्याची जबाबदारी उमेशवर होती. एका धावाने का होईना, हा सामना विराट टीमने जिंकला.
(लेखक संपादकीय सल्लागार आहेत.)