- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)
आत्तापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सर्व सत्रांपैकी यंदाचे १२ वे सत्र सर्वोत्तम होते यात कोणाचेही दुमत नसेल. यंदा अनेक शानदार वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी पाहण्यास मिळाली, अनेक सामन्यांचे निकाल अखेरच्या क्षणी लागले आणि मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवण्यास मिळाला. चेन्नईचा संघ का हरला यासाठी अनेक विश्लेषणे समोर आली, पण त्यांच्या कर्णधाराने सर्वोत्तम कामगिरी केली. अंतिम सामना संपल्यानंतर धोनीने म्हटले की, ‘आम्ही विजेत्या संघापेक्षा एक चूक जास्त केली.’
प्रचंड दबावाखाली अंतिम सामन्यात दोन्ही संघांकडून चुका झाल्या आणि त्यामुळेच यंदाच्या सत्रात ज्यांनी आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर छाप पाडली, त्यांच्याकडूनही मोठ्या चुका झाल्याचे पाहण्यास मिळाले. मुंबईने शेन वॉटसनला तीन जीवदान दिले आणि याचा फायदा घेत चेन्नईने जबरदस्त पुनरागमनही केले. आॅस्टेÑलियाचा हा शानदार सलामीवीर सुरुवातीला धावांसाठी झगडत होता, मात्र नंतर जम बसताच त्याने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते.
चेन्नईकडून अत्यंत थोडा, पण निर्णायक क्षणी वाईट खेळ झाला. त्यांच्यासाठी धोनी आणि वॉटसनचे धावबाद होणे सर्वांत महागडे ठरले. त्याचवेळी फाफ डूप्लेसिसचे अपयश मुंबईसाठी मोलाचेही ठरले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरेश रैनाने सोडलेला हार्दिक पांड्याचा झेल विसरता कामा नये. यामुळे हार्दिकने अतिरिक्त १० धावांची खेळी केली आणि याचमुळे सामना अखेरपर्यंत ताणला गेला. हाच क्षण सामन्यातील ‘गेम चेंजर’ ठरला.
मी इतर सामन्यांविषयी जास्त भाष्य करणार नाही. पण मुंबई व चेन्नईची कामगिरी लीगमध्ये लक्षवेधी ठरली आहे. आत्तापर्यंतच्या सर्व १२ सत्रांमध्ये या दोन संघांनी मिळून ७ विजेतेपदे पटकावली आहेत. याव्यतिरिक्त कोलकाता व हौदराबाद यांनी प्रत्येकी २, तर राजस्थानने एकदा बाजी मारली आहे. मुंबई आता चार विजेतेपदांसह इंचभर चेन्नईच्या पुढे आहे. पण त्याचवेळी चेन्नईने दोन वर्षांच्या बंदीनंतरही तब्बल ८ वेळा अंतिम फेरी गाठली आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.
टी२० क्रिकेटमध्ये अंदाज वर्तविणे अत्यंत कठीण असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथे एकाच प्रकारची गुणवत्ता पाहण्यास मिळते. त्यामुळे चेन्नई-मुंबईच्या वर्चस्वाबद्दल काय म्हणायचे? सर्व खेळाडू आणि संघ जिंकण्यासाठी खेळतात. पण, मजबूत व्यवस्थापन, उच्च दर्जाचे खेळाडू, काही प्रमाणात नशीब आणि सर्वांत महत्त्वाचे कठोर प्रक्रिया, जबाबदारीची जाणीव या सर्वांच्या मिश्रणाने विजयी चव चाखता येते. या सर्व गोष्टींची मदत चेन्नईला २०१८ साली झाली. तसेच मुंबईनेही याच जोरावर बाजी मारली असल्याचे म्हणता येईल.
दोन्ही संघांनी आपली कोअर खेळाडूंची चमू सारखीच ठेवली. चेन्नईसाठी धोनी, रैना, जडेजा आणि फ्लेमिंग-हसी या प्रशिक्षकांची जोडी कायम राहिली. दुसरीकडे मुंबईसाठी रोहित, पांड्या बंधू आणि पोलार्ड यांचे स्थान कायम राहिले. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणे आणि दबावाचा यशस्वीपणे सामना करणे चेन्नई-मुंबईच्या यशाचे मंत्र ठरले आहेत.
आयपीएल इलेव्हन : चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा चमू
डेव्हिड वॉर्नर : त्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी होती आणि त्यात तो यशस्वीही ठरला.
रोहित शर्मा (कर्णधार) : फलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण कर्णधार म्हणून तो सर्वोत्तम ठरला. त्यामुळेच बेअरस्टो आणि बटलर माझ्या संघात नाहीत.
लोकेश राहुल : निलंबनामुळे राहुल अडचणीत होता. मात्र त्याने शानदार शैलीत पुनरागमन केले. प्रत्येक सामन्यागणिक त्याची कामगिरी सुधारली.
रिषभ पंत : मॅच विनर खेळाडू, विश्वचषकातून पंतला वगळल्याचे आश्चर्य वाटले.
महेंद्रसिंग धोनी : रोहित शर्माकडून नेतृत्वाच्या शर्यतीत धोनी मागे पडला, पण यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून तो शानदार ठरला.
आंद्रे रसेल : अफलातून फटक्यांमुळे रसेल इतरांपेक्षा वेगळा ठरला.
हार्दिक पांड्या : राहुलप्रमाणेच दबावाखाली होता. पण अष्टपैलू म्हणून मुंबईसाठी अप्रतिम ठरला. विशेषत: फलंदाजीमध्ये.
रविचंद्रन अश्विन : ‘मांकडिंग’मुळे अश्विन वादात अडकला, पण नियंत्रित गोलंदाजीमुळे त्याने लक्ष वेधले. उत्तम इकॉनॉमी आणि स्ट्राईक रेट.
इम्रान ताहिर : वय केवळ आकडा असतो हे सिद्ध करताना ताहिरने भेदक मारा केला. मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना त्याने कमालीचे सातत्य राखले.
कागिसो रबाडा : सातत्याने वेग, अचुकता आणि नियंत्रित मारा केला. दुर्दैवाने प्ले आॅफ खेळू न शकल्याने दिल्लीचे नुकसान झाले.
जसप्रीत बुमराह : जगातील सर्वोत्तम गोलंदाज, दबावाच्या क्षणी चांगली इकॉनॉमी राखून बळी घेण्याची क्षमता.