जयपूर : अनेक पराभवानंतर शेवटी आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळविण्यात यशस्वी ठरल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स संघ सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयाची लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दिल्लीने आतापर्यंत गृहमैदानाच्या तुलनेत बाहेरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे, पण शनिवारी त्यांनी कोटलावर किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच गडी राखून पराभव करीत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले.
दुसऱ्या बाजूचा विचार करता राजस्थाननेसुद्धा मुंबई इंडियन्ससारख्या दिग्गज संघाचा पराभव केला आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उभय संघांनी यापूर्वीच्या लढतींमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला असल्यामुळे सोमवारची लढत रंगतदार होईल.
निराशाजनक कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आणि सलामीवीर म्हणून त्याच्या स्थानी राहुल त्रिपाठीला खेळविण्यात येऊ शकते. त्रिपाठीने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ४५ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती, तर रहाणेने २१ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या होत्या. त्यावेळी संघाला १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
कोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर स्मिथ फॉर्मात आला आहे. दुसरीकडे संजू सॅम्सन व रियान पराग यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरत आहे. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. जोफ्रा आर्चर व लेग स्पिनर श्रेयस गोपाल यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
दुसºया बाजूचा विचार करता दिल्ली संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. सलामीवीर शिखर धवनने पंजाबविरुद्ध ४१ चेंडूंमध्ये ५६ धावा तर कर्णधार श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंमध्ये नाबाद ५८ धावा केल्या. या व्यतिरिक्त पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि कोलिन इनग्राम यांच्या समावेशामुळे दिल्ली संघाची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा शानदार फॉर्मात आहे. ईशांत शर्मा, फिरकीपटू संदीप लामिछाने, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरत आहे. आणखी एक विजय दिल्ली संघासाठी प्ले-आॅफचा मार्ग प्रशस्त करू शकतो आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतील. (वृत्तसंस्था)
धवलकडून राजस्थानला अपेक्षा
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात यश आलेले नाही. स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी त्याच्यासारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाकडून राजस्थानला भेदक स्विंग माºयाची अपेक्षा असेल.