- एबी डिव्हिलियर्स
युवा खेळाडूंचा भरणा असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ आणि अनुभवी खेळाडूंचा चेन्नई सुपरकिंग्स संघ यांच्यादरम्यानची लढत शानदार होईल. दिल्ली फॉर्मात असून त्यांच्या २४ सदस्यांच्या संघातील किमान १४ खेळाडू २६ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. संघाला रिकी पाँटिंग व सौरव गांगुली यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे. युवा खेळाडूंवर त्यांना दाखविलेला विश्वास उपयुक्त ठरला आहे.
शॉ व पंत यांनी शानदार फलंदाजी केली. पंतच्या आक्रमक फलंदाजीमुळे एलिमिनेटरमध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली संघाला विजय मिळवता आला. दिल्लीची गोलंदाजी संतुलित असून फॉर्मात आहे. योग्य वेळी सूर गवसणे आणि सातत्य राखणे कठीण असते, पण या युवा संघाने मोक्याच्या क्षणी दोन्ही बाबी मिळविल्या आहेत.
पण, या संघाला अनुभवी चेन्नईच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे, हे विसरता येणार नाही. चेन्नईने वारंवार स्वत:ला सिद्ध केले आहे. सरासरी ३० वर्षे वय असलेले त्यांचे खेळाडू अन्य कुठल्याही खेळाडूंच्या तुलनेत कमी नाही. हा धोनीने तयार केलेला संघ आहे. हा संघ बाद फेरीत पूर्ण आत्मविश्वासाने खेळेल. कुठल्या क्षणी काय करायचे, याची अचूक कल्पना असलेला हा संघ आहे. चेन्नई एक मजबूत संघ आहे. शेन वॉटसनला सलामीला खेळण्याचा चांगला अनुभव असून तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, यात कुठले आश्चर्य नाही. इम्रान ताहिर चेन्नईच्या गोलंदाजी आक्रमणातील महत्त्वाचे अस्त्र सिद्ध झाला आहे.
उभय संघांना एकमेकांचे शक्तिस्थळ व कमकुवत बाजूंची चांगली कल्पना आहे, पण कुठल्याही संघाला विशाखापट्टणमच्या खेळपट्टीची कल्पना नाही. येथे १६०-१६५ धावसंख्या स्पर्धात्मक ठरण्याचा अंदाज आहे. दिल्ली संघाने कधीच अंतिम फेरी गाठलेली नाही. जर हा युवा संघ दडपणाखाली शांतचित्ताने कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरला तर त्यांना अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. तरी, कुणी मूर्खच सीएसकेला कमी लेखण्याची चूक करेल.