नवी दिल्ली, आयपीएल 2019 : इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही. प्ले ऑफ शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठीच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना अपयश आले. रियान पराग वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. राजस्थानने 116 धावांचे माफक लक्ष्य दिल्लीसमोर ठेवले. परागने अर्धशतकी खेळी केली. परागने 47 चेंडूंत 50 धावा करून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान पटकावला. परागने 17 वर्ष 178 दिवस असताना अर्धशतक झळकावले. त्याने संजू सॅमसनचा 18 वर्ष 169 दिवसांचा विक्रम मोडला.
अजिंक्य रहाणे आणि लिएम लिव्हिंगस्टोन हे फलंदाज राजस्थानकडून सलामीला आले. संयमी सुरुवातीनंतर राजस्थानला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. दिल्लीच्या इशांत शर्माने राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (2) शिखर धवन करवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने फटकेबाजी केली, परंतु शर्माने चौथ्या षटकात लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला. राजस्थानचे सलामीचे 2 फलंदाज 20 धावांवर माघारी परतले होते. पुढच्याच षटकात संजू सॅमसनला अती घाई नडली. पृथ्वी शॉने त्याला धावबाद केले. राजस्थानची पडझड थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. महिपाल लोमरोरही इशांच्या गोलंदाजीवर माघारी परलता. त्यांची अवस्था 4 बाद 30 अशी दयनीय झाली होती. नऊ षटकांत राजस्थानने अर्धशतक पूर्ण केले.
रियान पराग आणि श्रेयस गोपाळ हे राजस्थानचा डाव सावरतील असे वाटत होते. त्यांनी तसा खेळही केला, परंतु 12व्या षटकात अमित मिश्राने ही जोडी तोडली. मिश्राच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने गोपाळ यष्टिचीत होऊन माघारी परतला. गोपाळने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीही पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता माघारी फिरला. रिषभ पंतने त्याचा झेल घेतला. मिश्राला हॅटट्रिकची संधी होती, परंतु ट्रेंट बोल्टने गोवथमचा झेल सोडला अन् मिश्राची संधी हुकली. पण, पुढच्याच षटकात त्यानं विकेट घेतली. त्याने गोवथमला इशांत शर्माकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
परागने एका बाजूनं खिंड लढवत इश सोढीसह राजस्थानसा समाधानकारक पल्ला गाठून देण्याच्या दिशेने कूच करून दिली. बोल्टने ही जोडी तोडली. त्याने सोढीला ( 6) अमित मिश्राकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. परागने राजस्थानला समाधानकारक पल्ला गाठून दिला.