Join us  

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाचा सामना, दिल्लीचं स्वप्नभंग

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: पहिल्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सवर नशीब रुसलेलं पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:03 PM

Open in App

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : पहिल्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सवर नशीब रुसलेलं पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्लीनं सामन्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांना बाद करण्याची सोपी संधी गमावली आणि त्यांचा आत्मविश्वासही हरवला. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. अन्य फलंदाजांनी त्यावर कळस चढवत चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील 100 वा विजय ठरला. मुंबई इंडियन्सनंतर विजयाचे शतक पूर्ण करणारा हा दुसरा संघ ठरला. चेन्नईने 164 सामन्यांत 100 विजय मिळवले. चेन्नई आणि मुंबई यांच्यात आता जेतेपदाची लढत होणार आहे आणि आयपीएलचे जेतेपद चौथ्यांदा कोण पटकावतो याची उत्सुकता लागली आहे. 

महत्त्वाच्या सामन्यात दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एकेक पत्ते बाहेर काढून दिल्लीच्या धावांवर अंकुश ठेवला. कॉलीन मुन्रो आणि रिषभ पंत वगळता दिल्लीच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.  पंतने 25 चेंडूंत 38 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 1 षटकार खेचला. चेन्नईकडून दीपक चहर, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला असता, परंतु दिल्लीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने संधी गमावली. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फॅफ ड्यू प्लेसिसने चेंडू टोलावला. तो चेंडू दिल्लीच्या खेळाडूच्या हातात असतानाही नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शेन वॉटसनने धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. फॅफ आणि वॉटसन यांच्यातील समन्वयाच्या फायदा दिल्लीला सहज झाला असता. त्यांना दोघांनाही धावबाद करण्याची संधी होती, परंतु धावबाद सोडा दिल्लीच्या खेळाडूंनी चेन्नईला अतिरिक्त धावा दिल्या. दिल्लीच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करताना चेन्नईच्या फलंदाजांना दबावात ठेवले. फॅफ आणि वॉटसन यांनीही कोणताही धोका न पत्करता सावध खेळावर भर दिला.  खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फॅफने आक्रमक खेळ सुरू केला. त्याने सहाव्या षटकात इशांत शर्माला सलग तीन चौकार ठोकले. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 42 धावा केल्या. नशीबानेही चेन्नईच्या फलंदाजांची भरपूर साथ दिली. 9व्या षटकात वॉटसनचा झेल टिपण्यात दिल्लीच्या खेळाडूला अपयश आले. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर वॉटसनने मारलेला चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु तो टिपण्यासाठी दिल्लीचा क्षेत्ररक्षक जवळ येईपर्यंत चेंडू जमिनीवर आला होता. फॅफने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफचे हे यंदाच्या सत्रातील तिसरे आणि एकूण आयपीएलमधील 12वे अर्धशतक ठरले. मात्र, 39व्या चेंडूवर फॅफने विकेट फेकली. ट्रेंट बोल्टला मोठा फटका मारण्याच्या नादात तो किमो पॉलकरवी झेलबाद झाला. फॅफने 7 चौकार व 1 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. 

फॅफनंतर वॉटसनने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेत दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने 12व्या षटकात किमो पॉलच्या गोलंदाजीवर तीन खणखणीत षटकार आणि एक चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 31 चेंडूंत 50 धावा केल्या. पण, 32व्या चेंडूवर तोही बाद झाला. मिश्राच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात त्याने बोल्टच्या हाती झेल दिला. 50 धावांच्या खेळीत त्याने 3 चौकार व 4 षटकार खेचले. सुरेश रैनाही ( 11) लगेच बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईनं आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी धाव धोनीला घेता न आल्याची खंत मात्र त्याच्या चाहत्यांना वाटली. 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स