चेन्नई, आयपीएल 2019 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 12 व्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करताना प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतली आहे. त्यांच्या या यशात 40 वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहीर याचा महत्त्वाचा वाटा आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक 13 विकेट घेण्याचा मान त्याने पटकावला आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तो कडवी टक्करही देत आहे. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याची ताहीरची स्टाईल सर्वांना आकर्षित करत आहे. या सेलिब्रेशनमागे एक सिक्रेट आहे आणि ते ताहीरने अखेरीस सांगितले.
चेन्नईच्या फॅन्समध्येही ताहीरची जादू चालली आहे. विकेट टिपल्यानंतर बेभान होऊन त्याचे मैदानावर धावणे, अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. त्याच्या या सेलिब्रेशनच्या स्टाईलमुळे चाहत्यांनी त्याला 'परसख्ती एक्स्प्रेस' असे टोपण नावही दिले आहे. ''माझी पत्नी आणि मुलगा काहीवेळा सामना पाहायला उपस्थित असतात आणि मी जेवढा CSKवर प्रेम करतो, तितकाच त्यांच्यावरही करतो, हे मला त्यांना सांगायचे असते. त्यामुळे विकेट घेतल्यानंतर मी त्यांच्या दिशेने धावतो, परंतु अनेकदा उत्साहात नक्की कोणत्या दिशेने धावतो हे मलाही माहित नसते. आशा करतो की लोकांना माझी ही स्टाईल आवडत असावी. असाच विकेट घेऊन सेलिब्रेशन करण्याची मला संधी मिळूदे, ही देवाकडे प्रार्थना,'' असे मत ताहीरने व्यक्त केले.
तो पुढे म्हणाला,''CSK सोबत खेळणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. आता मी येथे आहे आणि मला ही संधी गमवायची नाही. मला हा व्यासपीठ दिल्याबद्दल देवाचे आभार. ही जगातील सर्वोत्तम लीग आहे आणि चेन्नई जगातील सर्वोत्तम संघापैकी एक आहे.'' दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने 8 सामन्यांत 13 विकेट घेतले.