चेन्नई, आयपीएल 2019 : लुंगी एंगीडीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूनं इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिलीनं मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिलीच्या पत्नीनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले. तो आता आयपीएलच्या संपूर्ण सत्रात खेळणार नाही. सलग दोन सामने जिंकून विजयरथावर स्वार असलेल्या कॅप्टन कूल धोनीची चिंता वाढली होती, परंतु चेन्नईने एंगीडीला बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला करारबद्ध केले आहे. पण, व्हिलीला बदली खेळाडू कोण, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
चेन्नईने आयपीएलच्या 12व्या सत्रासाठी आठ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते आणि व्हिली हा त्यापैकी एक आहे. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला गतवर्षी केदार जाधवच्या जागी करारबद्ध केले होते आणि 2019च्या लिलावात चेन्नईने त्याला कायम राखले. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एंगीडीला दुखापतीमुळे आधीच माघार घ्यावी लागली होती. त्याची उणीव जाणवत असल्याची कबुली कॅप्टन धोनीनं दिली होती. त्यात व्हिलीच्या जाण्यानं चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी उद्धाटनीय सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरूचा संपूर्ण संघ 70 धावांत माघारी पाठवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने यजमान दिल्ली कॅपिटल्सचे 148 धावांचे लक्ष्य 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केले. चेन्नईचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. राजस्थानला आपल्या दोन्ही सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे विजयी हॅटट्रिक साजरी करण्याचे लक्ष्य असणार आहे.
एंगीडीला बदली खेळाडू म्हणून चेन्नईने न्यूझीलंडच्या 27 वर्षीय गोलंदाज स्कॉट कुगेलेग्नला चमूत दाखल करून घेतले आहे. स्कॉटने न्यूझीलंड संघाकडून 2 वन डे आणि 4 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. स्कॉटवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले आहेत आणि भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातही त्याच्यावर टीका झाली होती.