हैदराबाद, आयपीएल 2019 : जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी खेळीनंतर मोहम्मद नबीच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. बेअरस्टो आणि वॉर्नर या दोघांनी शतकी खेळी करून सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 2 बाद 231 धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात बंगळुरूच्या संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतना बंगळुरूचे धुरंधर अपयशी ठरले. नबीने 4 षटकांत 11 धावा देत 4 विकेट घेत बंगळुरूला मोठा धक्का दिला. या सामन्यात एक प्रसंग असा घडला की एका चेंडूवर दोन फलंदाज धावबाद झाले. RCBच्या फलंदाजांची झालेली फजिती पाहून अनेकांना हसू आवरत नव्हते.
बंगळुरूच्या डावातील 19व्या षटकात विजय शंकरनं नो बॉल टाकला. त्यावर मोहम्मद सिराजने फटका मारला आणि धाव घेण्यासाठी धावला. पण, नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या डी ग्रँडहोमने त्याला माघारी पाठवले. थोडा पुढे गेलेला ग्रँडहोमही माघारी परतला, परंतु त्यापूर्वी शंकरने चेंडू यष्टीवर आदळला होता. त्याचवेळी त्यानं स्ट्राकवर असलेल्या सिराजच्या दिशेने चेंडू टाकून त्यालाही धावबाद केले. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आली आणि ग्रँडहोमला बाद ठरवण्यात आले.
231 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. हैदराबादच्या मोहम्मद नबीनं बंगळुरूचा सलामीवीर पार्थिव पटेलला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. चौथ्या षटकात मोहम्मद नबीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दोन धक्के दिले. शिमरोन हेटमायर पाठोपाठ नबीने बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सलाही माघारी पाठवले. संदीप शर्माने सातव्या षटकात बंगळुरूचा कर्णधार
विराट कोहलीला बाद करत मोठा धक्का दिला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मोईन अली धावबाद झाला. बंगळुरूचा निम्मा संघ अवघ्या 30 धावांत माघारी परतला. नबीने आणखी एक धक्का दिला. त्याने शिवम दुबेला बाद करताना बंगळुरूची 6 बाद 35 धावा अशी दयनीय अवस्था केली.
प्रयास रे बर्मन आणि डी ग्रँडहोम यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघर्ष केला. पण, त्यांचा हा संघर्ष बंगळुरुला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला नाही. सिद्धार्थ कौलने बंगळुरुला धक्का दिला. प्रयास बर्मनला त्याने बाद केले. प्रयासने 24 चेंडूंत 19 धावा केल्या. बंगळुरूला हा सामना गमवावा लागला. डी ग्रँडहोमने 32 चेंडूंत 37 धावा केल्या.
पाहा संपूर्ण व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/159084/comedy-of-errors-1-ball-2-run-outs