Join us  

IPL 2019: '...तर चेन्नई सुपरकिंग्स IPL ट्रॉफी जिंकू शकत नाही'; प्रशिक्षकानेच टोचले कान

सात सामने जिंकल्याचा आनंद असला, तरी ज्या पद्धतीने जिंकलो, ते फारसं समाधानकारक नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:16 PM

Open in App
ठळक मुद्देचेन्नई सुपरकिंग्स यंदाच्या पर्वातही अव्वल स्थानी विराजमान आहे. चेन्नईचा संघ दहापैकी सात सामने जिंकला असला, तरी यावेळी त्यांची सांघिक कामगिरी अभावानेच दिसली आहे.बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात ४८ चेंडूत ८४ धावा करणाऱ्या धोनीचं त्यानं कौतुक केलं.

'आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ' या आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत चेन्नई सुपरकिंग्स यंदाच्या पर्वातही अव्वल स्थानी विराजमान आहे. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्येही त्यांचं नाव सगळ्यात वर आहे. परंतु, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही. चेन्नईचा विजयरथ गेल्या सामन्यात हैदराबादने रोखला आणि काल बेंगलोरनंही त्यांना पराभवाचा धक्का दिला. या पार्श्वभूमीवरच, चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने खेळाडूंचे कान टोचलेत. चेन्नईचा संघ दहापैकी सात सामने जिंकला असला, तरी यावेळी त्यांची सांघिक कामगिरी अभावानेच दिसली आहे. नेमकं याच मुद्द्याकडे फ्लेमिंगने लक्ष वेधलंय.  

महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू या दोघांवर चेन्नई संघ खूपच अवलंबून आहे. दरवेळी संकटसमयी त्यांचाच आधार घ्यावा लागतोय. हे जर असंच सुरू राहिलं, तर जेतेपद शक्य नाही, असं परखड मत स्टीफन फ्लेमिंगने मांडलं आहे. आमचे खेळाडू थोडे निष्काळजीपणे खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. रविवारचा (बेंगलोरविरुद्धचा) सामना हे त्याचंच उदाहरण आहे. म्हणूनच सात सामने जिंकल्याचा आनंद असला, तरी ज्या पद्धतीने जिंकलो, ते फारसं समाधानकारक नाही, याकडेही त्यानं लक्ष वेधलं. एक टप्पा आम्ही ओलांडला आहे. त्यामुळे अधिक दर्जेदार खेळाची सगळ्यांनाच अपेक्षा आहे. अशावेळी चेन्नईच्या सलामीवीरांना सूर सापडणं गरजेचं असल्याचंही त्यानं नमूद केलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात ४८ चेंडूत ८४ धावा करणाऱ्या धोनीचं त्यानं कौतुक केलं. काही चेंडूंवर एकेरी धावा घेणं शक्य असताना आणि समोर ब्राव्हो असतानाही धोनीनं त्या का टाळल्या, असा प्रश्न पत्रकारांनी फ्लेमिंगला विचारला. तेव्हा, धोनीच्या डोक्यात एक गणित होतं, सामना जिंकवण्याबद्दल त्याला विश्वास वाटत होता आणि असं असताना त्याला प्रश्न विचारण्याऐवजी पाठिंबा देणंच अधिक योग्य होतं, असं सांगत फ्लेमिंगनं धोनीवरचा विश्वास व्यक्त केला. 

चेन्नईचा प्ले-ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. आणखी एखादा सामना जिंकला की त्यावर शिक्कामोर्तबही होईल. परंतु, धोनीसेनेला तेवढ्यापुरता विचार न करता, फ्लेमिंगची सूचना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण, शेवटच्या टप्प्यात स्पर्धेतील चुरस वाढत जाणार असल्याचे संकेत हळूहळू मिळत आहेत. 

१७ एप्रिलच्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला फक्त १३२ धावा करता आल्या होत्या. त्या हैदराबादनं १७व्या षटकातच पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर, काल बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातही धोनी आणि रायुडू टिच्चून उभे राहिले नसते, तर त्यांची अगदीच दैना झाली असती. 

 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीअंबाती रायुडू