चेन्नई : गेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीनंतरही एका धावेने पराभव स्वीकारणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मंगळवारी आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. चेन्नईची अडचण आघाडीच्या फळीची निराशाजनक कामगिरी आहे, तर सनरायझर्स संघासाठी केवळ सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (५१७) आणि जॉनी बेयरस्टॉ (४४५) रन मशीन बनले आहेत. त्यांची मधली फळी फ्लॉप ठरली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध रविवारच्या लढतीत प्रत्येकाच्या तोंडी धोनीच्या आक्रमक खेळीची चर्चा आहे. पण आघाडीचे तीन फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधारावरील दडपण वाढते, हे विसरता येणार नाही. गेल्या मोसमातील हिरो शेन वॉटसन (१४७ धावा), अंबाती रायुडू (१९२ धावा) आणि सुरेश रैना (२०७ धावा) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अशास्थितीत धोनीवर दडपण वाढले आहे. दुसºया बाजूचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळविल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असल्याने हा संघ चेन्नईविरुद्ध लय कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)