कोलकाता : कर्णधार रविचंद्रन अश्विन मंकड वादात अडकला असताना किंग्स इलेव्हन पंजाबला आयपीएलमध्ये पुढच्या लढतीत बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. अश्विनने जोस बटलरला मांकडगी बाद करीत वादाला जन्म दिला, पण त्याच्या नेतृत्वाखालील संघाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १४ धावांनी विजय मिळवला.
बटलरने ४३ चेंडूंना सामोरे जाताना ६९ धावा केल्या होत्या. त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघ १८५ धावांचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता, पण तो बाद झाल्यानंतर रॉयल्सचे ८ फलंदाज ६२ धावांच्या मोबदल्यात तंबूत परतले आणि पंजाबने जयपूरमध्ये प्रथमच विजयाची चव चाखली. अश्विनने जे काही केले ते नियमात बसणारे होते, पण त्यामुळे मोठा वाद झाला आहे.या अनावश्यक वादादरम्यान अश्विन व त्याचा संघ ईडन गार्डन्सवर कसा खेळतो, याबाबत उत्सुकता आहे.
पंजाबतर्फे ख्रिस गेलने ४७ चेंडूंना सामोरे जाताना ७९ धावा केल्या तर केकेआरतर्फे जमैकाचा आंद्रे रसेल शानदार फॉर्मात आहे. या दोन कॅरेबियन खेळाडूंची टक्कर बघण्यासारखी राहील. गेलने संथ सुरुवात केली, पण त्यानंतर त्याने लौकिकाला साजेसा खेळ केला. यापूर्वी केकेआरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गेलला ईडन गार्डन्सची चांगली कल्पना आहे आणि फिरकीपटूंवर अवलंबून असलेल्या केकेआरच्या गोलंदाजांविरुद्ध तो वर्चस्व गाजवू शकतो.
दुसऱ्या बाजूचा विचार करता आंद्रे रसेलने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध १९ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा फटकावत केकेआरला विजय मिळवून दिला होता. त्या लढतीत केकेआरचा स्टार फिरकीपटू व आक्रमक सलामीवीर फलंदाज सुनील नरेनच्या बोटाला दुखापत झाली होती. केकेआर संघ व्यवस्थापनाला तो फिट होईल, अशी आशा आहे. या लढतीनंतर केकेआर संघाला पुढील चार सामने बाहेर खेळायचे आहेत आणि १२ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी ते ईडन गार्डन्सवर परततील. (वृत्तसंस्था)