नवी दिल्ली : हेलिकॉप्टर शॉटचा जनक म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. पण, त्याच्या या शॉटची आता आयपीएलमध्ये अनेक जणं कॉपी करताना दिसत आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या रशीद खाननंतर मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्यानं काही सामन्यांमध्ये हेलिकॉप्टर शॉट लगावले. हार्दिकनं तर त्यानं मारलेला हेलिकॉप्टर शॉट कसा वाटला, अशी विचारणा थेट धोनीकडे केली. धोनीलाही हार्दिकचा हेलिकॉप्टर आवडला आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात हार्दिकने आतापर्यंत 194.64च्या स्ट्राईक रेटनं 218 धावा केल्या आहेत.
गुरुवारी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर हेलिकॉप्टर शॉट लगावला. 25 वर्षीय हार्दिकने 15 चेंडूंत 32 धावांची खेळी करताना मुंबई इंडियन्सला 5 बाद 168 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईने हा सामना 40 धावांनी जिंकला. हार्दिकने आपल्या खेळीत 2 चौकार व 3 षटकार खेचले.
हेलिकॉप्टर शॉटवर धोनीची प्रतिक्रीया घेण्यासाठी हार्दिक थेट कॅप्टन कूलच्या रूममध्ये गेला. तो म्हणाला,''मी कधी विचार केला नव्हता की मी हेलिकॉप्टर शॉट मारू शकेन. नेटमध्ये मी हा फटका मारण्याचा अभ्यास केला. काही सामन्यांत हा फटका मारल्यानंतर मी थेट धोनीच्या रुममध्ये गेलो होतो आणि त्याला हा फटका आवडला का हे विचारले. ''