Join us  

Bad News : मुंबईचा 'मॅच विनर' जायबंदी, संपूर्ण आयपीएललाच मुकणार

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:45 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल पदार्पणातच विक्रमी कामगिरी करणारा मुंबईचा गोलंदाज अल्झारी जोसेफ दुखापतग्रस्त झाला असून तो उर्वरीत आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता बळावली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्झारीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. चेंडू अडवताना अल्झारीने डाईव्ह मारली आणि त्यात त्याने दुखापत करून घेतली. 

पदार्पणाच्या सामन्यातच अल्झारीने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी बदली खेळाडू म्हणून अल्झारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. तन्वीरने 2008मध्ये 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम १२ वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता. 

आयपीएलमधील पदार्पणातील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. अँड्य्रू टाय याच्यानंतर ( 5/17) पदार्पणात पाच विकेट घेणारा अल्झारी हा दुसरा गोलंदाज ठरला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजाने नोंदवलेली ही आठवी सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रमावारीत लसिथ मलिंगा ( 6/7, 2012), कायले जेमीएसन ( 6/7, 2019), फाफामा फोजेला ( 6/9, 2014) हे अव्वल तिघांत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जोसेफच्या देशप्रेमाची प्रचिती आली होती. जोसेफ आईच्या निधनानंतर काही कालावधीतच सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर परतला होता. वेस्ट इंडिजने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.

मुंबई इंडियन्सचा आज वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना होणार आहे. अल्झारीच्या जागी लसिथ मलिंगा संघात परतणार आहे.  

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर