Join us

IPL 2019 : Bad News; आंद्रे रसेल पुढच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

रसेलची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 18:42 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी असून पुढच्या सामन्याला कोलकाता नाइट रायडर्सचा आंद्रे रसेल खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. रसेल हा कोलकात्याच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांमध्ये त्याने कोलकात्याच्या कामगिरीत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात रसेल खेळणार नसेल तर आयपीएलच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असेल.

कोलकात्याच्या यापूर्वी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलला मैदानात दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मोठा फटका मारताना रसेलला स्नायूंची दुखापत झाली होती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रसेलचे स्नायू दुखावले होते. त्यानंतर कोलकात्याच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली होती. रसेलवर त्यावेळी मैदानातच उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याने फलंदाजीही केली होती. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही रसेलला दुखापत झाली होती.

सध्याच्या घडीला रसेल हा मनगटाच्या दुखापतीने हैराण आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच रसेलला आगामी सामन्यांमध्ये विश्रांती मिळू शकते, असे म्हटले जात आहे. रविवारी कोलकात्या सामना चेन्नईबरोबर होणार आहे. पण या सामन्यात रसेलच्या संघ समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कोलकाता आणि चेन्नई यांच्यामध्ये रविवारी दुसरा सामना असेल. यापूर्वी झालेल्या या दोघांच्या सामन्यामध्ये चेन्नईने सहजपणे कोलकातावर विजय मिळवला होता. या सामन्यात रसेलच्या अर्धशतकी खेळीमुळेच कोलकात्याला शतकाची वेस ओलांडता आली होती.

अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला

कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या आतषबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलची बॅट चांगलीच तळपली, परंतु सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताला हार मानावी लागली. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे  धावांचे 186 आव्हान ठेवले. रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. पण, सामन्यात एक क्षण असा आला की, कोलकाताच्या खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला होता. चौकार - षटकारांची आतषबाजी करणारा रसेल खेळपट्टीवर वेदनेनं कळवळताना दिसला. 

दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या दहा षटकांमध्ये पाहायला मिळाले. कारण दिल्लीने कोलकात्याचा अर्धा संघ फक्त 61 धावांमध्ये गुंडाळला. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. दिनेश कार्तिकनेही यावेळी 36 चेंडूंत 50 धावांची खेळी साकारली. दिल्लीच्या ख्रिस मॉरिसने रसेलला बाद केले. पण, 14 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चेंडू आद्रे रसेलच्या खांद्यावर आदळला आणि तो जमिनीवर लोळू लागला. त्यामुळे सामन्यातील वातावरण गंभीर झाले होते. पण, अवघ्या काही मिनिटांत रसेल उभा राहिला... त्यानंतर रसेल वादळ घोंगावलं.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स