Join us  

IPL 2018 - सचिन तेंडुलकरला भोपळाही न फोडू देणारा शेवटचा बॉलर झाला 'मुंबईकर'

विशेष म्हणजे सचिन आणि द्रविड व्यतिरिक्त विराट कोहलीच्या कारकिर्दीत पहिला भोपळा देखील याच गोलंदाजामुळे जमा झाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 10:55 AM

Open in App

मुंबई - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेसन बेहरनडोर्फ याला मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले आहे. रविवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात त्याच्यासाठी मुंबईने 1.5 कोटी रुपये मोजले. भारताचा माजी दिगग्ज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांनाही शून्यावर बाद करण्याची किमया त्याने केली होती. अधिकृत टी-20  सामन्यात सचिन, द्रविडला शून्यावर बाद करणारा बेहरनडोर्फ अखेरचा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे सचिन आणि द्रविड व्यतिरिक्त बेहरनडोर्फने विराट कोहलीलाही खातं न खोलता बाद केलं आहे. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतला तो पहिला भोपळा ठरला होता. त्याने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असलं तरी सचिन,द्रविडला शून्यावर बाद करण्याची कामगिरी त्याने 2013 मध्येच केली होती.

2013 साली भारतात झालेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबई आणि राजस्थानचा संघही होता. त्यावेळी बेहरनडोर्फ ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळायचा. 2 ऑक्टोबर 2013 ला दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात सामना झाला. दुसरं षटक टाकण्यासाठी बेहरनडोर्फ आला. त्यावेळी सचिन एका चेंडूचा सामना करून शून्यावर खेळत होता.  बेहरनडॉर्फच्या पहिल्याच चेंडूवर सचिन सॅम व्हाइटमॅनकडे झेल देऊन बाद झाला. तरीही 6 गडी राखून मुंबईने हा सामना जिंकला होता.  

लीगमधील 15वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पर्थ स्कॉर्चर्समध्ये झाला. द्रविड राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला आला. बेहरनडॉर्फचे पहिले तीन चेंडू निर्धाव गेले आणि चौथ्या चेंडूवर द्रविड थेट क्लीन बोल्ड झाला. तेंडुलकर आणि द्रविडच्या व्यावसायिक क्रिकेट करिअरमधील तो शेवटचा भोपळा ठरला. 

त्यानंतर 2017 मध्ये बेहरनडॉर्फने रांची येथे झालेल्या सामन्यात भारताविरोधातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात  बेहरनडॉर्फने आपला जलवा दाखवला. 4 षटकात 21 धावा देऊन 4 विकेट त्याने घेतल्या. यामध्ये विराट कोहलीच्या कारकिर्दीतील पहिला भोपळा देखील आहे. बेहरेनडोर्फने रोहित शर्मा (8), विराट कोहली (0), मनीष पांडे (6) आणि शिखर धवन (2) यांची शिकार केली. त्याच्या या शानदार प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 8 विकेटने अगदी सहज विजय मिळवला.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018आयपीएलआयपीएल 2018सचिन तेंडूलकरराहूल द्रविड