पुढील महिन्यापासून सुरू होणा-या इंडियन प्रिमियर लिगच्या 11 व्या सत्रात दिनेश कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचं कर्णधारपद सांभाळेल. रॉबिन उथप्पाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी याबाबत घोषणा करण्यात आली. कोलकात्याला यशाच्या शिखरावर पोहोचवणा-या गौतम गंभीरवर बोली न लावल्यामुळे यंदा कोलकात्याचा कर्णधार कोण असेल याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण या घोषणेमुळे चर्चांना आता पूर्णविराम मिळाला.
आयपीएलच्या लिलावादरम्यान 32 वर्षांच्या कार्तिकला कोलकाताने 7.2 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. करणधारपदी कार्तिकची निवड झाल्याने त्याचे चाहते आनंदीत आहेत. दमदार फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठी ओळख असलेल्या कार्तिकला स्थानिक सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळण्याचा अनुभव आहे. 2009-10 मध्ये विजय हजारे चषकासाठी त्याने तामिळनाडूचं नेतृत्व केलं होतं. मी माझ्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करेल, मी उत्साहीत आहे असं कर्णधार मिळाल्यावर कार्तिक म्हणाला.