मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात आपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या रविंद्र जाडेजानं शनिवारी भेदक मारा केला. जाडेजाच्या अचूक गोलंदाजीमुळे चेन्नईनं बंगळुरूला अवघ्या 127 धावांमध्ये रोखलं. मात्र या सामन्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती विराटची विकेट आणि त्यानंतरची रविंद्र जाडेजाची रिअॅक्शन. षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीचा त्रिफळा उडवताच जाडेजानं हात उंचावून सेलिब्रेशन सुरू केलं. मात्र त्यानंतर लगेचच, अगदी दुसऱ्याच क्षणाला जाडेजाचा चेहरा अगदी निर्विकार होता. जणू काही चुकून विराटची विकेट घेतली, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.
विराट कोहलीसारख्या महत्त्वपूर्ण फलंदाजाची विकेट मिळूनही जाडेजानं त्याचं सेलिब्रेशन टाळल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. याबद्दलचा प्रश्न सामनावीराचा पुरस्कार देण्यात आल्यानंतर जाडेजाला विचारण्यात आला. यावर 'तो मी टाकलेला पहिलाच चेंडू होता, त्यामुळे मी सेलिब्रेशन करण्यास सज्ज नव्हतो,' असं उत्तर जाडेजानं दिलं. 'विराटला बाद करणं अवघड असतं. त्यामुळे त्याला बाद केल्यावर मोठं यश मिळाल्याचा विचार माझ्या डोक्यात होता,' असंही जाडेजानं म्हटलं.
या सामन्यात जाडेजाला हरभजन सिंगची उत्तम साथ लाभली. या दोघांनी मिळून 8 षटकांमध्ये अवघ्या 40 धावा घेत बंगळुरुचा निम्मा संघ तंबूत पाठवला. चेन्नईच्या शिस्तबद्घ माऱ्यामुळे बंगळुरुला 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 127 धावाच करता आल्या. बंगळुरुनं दिलेलं 128 धावांचं आव्हान चेन्नईनं 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18 षटकांमध्ये पार केलं. जाडेजानं या सामन्यात 18 धावांमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं. याबद्दल त्याचा सामनावीर पुरस्कारानं गौरव करण्यात आला.