ठळक मुद्देधोनी हा शांत कर्णधार आहे, तर कोहली हा आक्रमक. या दोघांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे. पण आयपीएलमध्ये नेतृत्व करत असताना मी त्यांची कॉपी करण्याता प्रयत्न करणार नाही.
नवी दिल्ली : यंदाची आयपीएल भारताचा फिरकीपटू आर. अश्विनसाठी खास ठरणार आहे. कारण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अश्विनला एखाद्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. पण संघाची धुरा वाहताना मी महेंद्रिसंग धोनी किंवा विराट कोहली यांची कॉपी करणार नाही, असे मत अश्विनने व्यक्त केले आहे.
आयपीएलमध्ये 2009 ते 2015 या कालावधीत अश्विन चेन्नई सुपर किंग्ज या संघात होता. यावेळी धोनी हा संघाचा कर्णधार होता. चेन्नईच्या संघाचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले तेव्हा अश्विन पुण्याच्या संघाकडून खेळत होता. पण या हंगामात त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने 7.60 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे आणि त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एका मुलाखतीमध्ये अश्विन म्हणाला की, " प्रत्येक कर्णधाराची निराळी शैली असते. धोनी हा शांत कर्णधार आहे, तर कोहली हा आक्रमक. या दोघांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे. पण आयपीएलमध्ये नेतृत्व करत असताना मी त्यांची कॉपी करण्याता प्रयत्न करणार नाही. कारण संघाची धुरा वाहण्याची माझी शैली वेगळी असेल. "