मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएल 2018चं जेतेपद पटकावलं. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात अंबाती रायडूनं विजयी चौकार लगावताच चेन्नईच्या संघानं एकच जल्लोष केला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चेन्नईच्या संघाचं अभिनंदन केलं. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांची फळी असलेला संघ अशी हैदराबादची ओळख होती. मात्र कालच्या सामन्यात हैदराबादचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी हैदराबादची जोरदार खिल्ली उडवली.