चेन्नई : दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सोमवारी साकारलेली चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची अर्धशतकी खेळी ही नजरेचे पारणे फेडणारी होती. या खेळीनंतर तो जुना धोनी पुन्हा एकदा गवसला असल्याचे मतही काही चाहत्यांनी व्यक्त केले. धोनी धडाकेबाज फलंदाजी करत असला तरी आयपीएलमध्ये ' या ' दुखण्याने त्याचा पिच्छा मात्र अजूनही सोडलेला नाही.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात धोनीने तुफानी फलंदाजी केली. या खेळीतील त्याचा एक षटकार चतर तब्बल 108 मीटर लांब गेला होता. आयपीएलमधला हा सर्वात लांब षटकारांच्या यादीतील दुसरा फटका ठरला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात धोनीला 31 धावांवर असताना जीवदान मिळाले होते, पण या गोष्टीचा कोणताच परीणाम धोनीवर झाला नाही. या जीवदानानंतरही त्याने जोरदार फटक्बाजी सुरुच ठेवली होती. धोनीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 22 चेंडूंत 2 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 51 धावांची खेळी साकारली होती.
या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, " सध्याच्या घडीला पाठीच्या दुखण्याने मी थोडासा त्रस्त आहे. पण सध्या आराम करायला वेळ मिळत नाही. त्याचबरोबर सरावासाठीही पुरेसा वेळ देता येत नाही. आयपीएलमध्ये 20 षटकांचे सामने असल्यामुळे जास्त ताण पडत नाही. त्यामुळेच मी ही स्पर्धा खेळू शकतो. "